Site icon लोकाशा-बंब न्यूज

आता ग्रामीण भागात एक मेपर्यंत जनता कर्फ्यू ! वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवा, अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, गावाबाहेरील कोणत्याही व्यक्तीस कोविडची चाचणी केल्याशिवाय प्रवेश देऊ नये, गृह विलगीकरणात असलेल्या रूग्णांकडून सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून घ्यावे, पुढील अनर्थ टाळायचा असेल तर आजच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सज्ज व्हा – अजित कुंभार


बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : येत्या एक मेपर्यंत गावागावात जनता कर्फ्यूचे स्वयंशिस्तीने व स्वयंस्फूर्तीने पालन करावे, असे आवाहन सीईओ अजित कुंभार यांनी एका पत्राव्दारे ग्रामपंचायतींना आणि त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना केले आहे. या जनता कर्फ्यूदरम्यान वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवावेत, अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, गावाबाहेरील कोणत्याही व्यक्तीस कोविड -19 चाचणी न करता प्रवेश देऊ नये, गृह विलगीकरणात असलेल्या रूग्णांकडून सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून घ्यावे, लक्षात ठेवा आपल्या गावाचे संरक्षण आपणच करू शकतो, पुढील अनर्थ टाळावयाचा असेल तर आजच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सज्ज व्हा, असे कुंभार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोवीड -19 या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे, वेळेवर काळजी घेतली जात नसल्यामुळे दैनंदिन मृत्युचे प्रमाण देखील वाढत आहे. जिल्ह्यातील सर्व गावात कोवीड -19 प्रतिबंधक नियमांचे जसे की, सर्वांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, वेळोवेळी साबणाने हात धुणे, सॅनीटायजरचा वापर करणे इत्यादींचे पालन करण्याबाबत सर्व ग्रामपंचायतींना यापूर्वीच सुचित करण्यात आले आहे. तसेच ‘मिशन झिरो डेथ’ अंतर्गत प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करून लक्षणे असणार्‍या रूग्णांचा शोध घेवून वेळीच उपचार करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. कोवीड -19 चा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी ग्रामपंचायतींची भूमिका खूप महत्वाची आहे. कोविड -19 संसर्गाची साखळी तोडावयाची असेल तर लोकांचा एकमेकांशी येणारा संपर्क कमी करावा लागणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना व निबंध यापूर्वीच घालून दिले आहेत. तसेच त्यास अनुसरून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी देखील जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहेत. परंतु आता गरज आहे ती गावकर्‍यांच्या स्वयंस्फूर्त व सक्रीय सहभागाची, म्हणूनच ग्रामीण भागातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक व गावकर्‍यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, आपल्या गावात जर कोवीड -19 पॉझीटीव्ह रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असतील तर आपण आपल्या गावात पुढील काही दिवस (किमान 1 मे 2021 पर्यंत ) जनता कर्फ्यू पाळावा, या कालावधीत गावाअंतर्गत वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवावेत. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, गावाबाहेरील कोणत्याही व्यक्तीस कोविड -19 चाचणी न करता प्रवेश देऊ नये, गृह विलगीकरणात असलेल्या रूग्णांकडून सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून घ्यावे, लक्षात ठेवा आपल्या गावाचे संरक्षण आपणच करू शकतो, पुढील अनर्थ टाळावयाचा असेल तर आजच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सज्ज व्हा, गावागावात जनता कर्फ्यूचे स्वयंशिस्तीने व स्वयंस्फूर्तीने पालन करा, असे आवाहन सीईओ अजित कुंभार यांनी केले आहे.
Exit mobile version