Site icon लोकाशा-बंब न्यूज

पोहनेरच्या अवैध वाळू उपसा प्रकरणी खा. डाॅ. प्रितमताई मुंडेंनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर!,परळीत उपोषणार्थींची घेतली भेट ; लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

परळी । दिनांक १५।
पोहनेर येथील गोदावरी गंगा पात्रातून राजरोसपणे वाळूचा मोठया प्रमाणावर अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा अन्यथा परिणामांना सामोरे जा अशा कडक शब्दांत तंबी देत खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आज महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. याप्रकरणात कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर खा. प्रितमताईंच्या मध्यस्थीने ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले.

पोहनेर येथील गोदावरी गंगा पात्रातून गेल्या कांही महिन्यांपासून उघडपणे मोठया प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत आहे. शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडवून हा प्रकार सर्रास सुरू आहे. माफियांपुढे पोलिस व महसूल प्रशासन शरण गेले असून त्यांचेवर काहीच कारवाई केली जात आहे. वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करून बुडवलेला महसूल वसुल करावा, उपसा केलेल्या वाळूचे पंचनामे करावेत आणि तातडीने उपसा थांबवावा या मागणीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तम माने, पंडितराव मुठाळ, विष्णू रोडगे, रमेश सहजराव, बळीराम वानखेडे यांनी उप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

अन् अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आज दुपारी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले तसेच तेथे उपस्थित असलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणावरून चांगलेच फैलावर घेतले. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, वाळू माफियांवर कडक कारवाई का होत नाही ? छूटपूट कारवाया करण्यापेक्षा बडे मासे पकडून त्यांचेवर कारवाई करा अन्यथा मला उपोषणाला बसावे लागेल, बाहेरील अधिकाऱ्यांची टीम बोलावून अवैध वाळू साठयांवर कारवाई करा अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले. दरम्यान, प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, उप जिल्हाधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार शेजूळ, नायब तहसीलदार रूपनर उपस्थित होते.
••••

Exit mobile version