अंबाजोगाई, दि. 8 (लोकाशा न्यूज) : नोकरीनिमित्त अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अंबाजोगाई येथील तरूण दाम्पत्याचा बुधवारी रात्री संशयास्पद मृत्यू झाला. या पती-पत्नीचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांची गोळ्या झाडून हत्या झाली असल्याचे रात्री उशीरासमोर आले आहे. दरम्यान, या दाम्पत्याची चार वर्षीय मुलगी सुखरूप आहे.
बालाजी भारत रूद्रवार (वय 32) आणि आरती बालाजी रूद्रवार (वय 30) असे या मयत पती-पत्नीची नावे आहेत. अंबाजोगाईतील प्रसिद्ध व्यापारी भारत रूद्रवार यांचा बालाजी हा मुलगा होता. आयटी कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने बालाजी हे सहा वर्षापूर्वी अमेरिकेत न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन भागात कुटूंबासह स्थायिक झाले होते. स्थानिक वेळेनुसार बुधवारी सायंकाळी त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत थांबल्याचे दिसून आल्याने शेजार्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीसांनी भेट दिली असता घरात बालाजी आणि आरती यांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आले. भारतीय वेळेनुसार गुरूवारी (दि.08) सकाळी 9 वा. तिथल्या पोलिसांनी या घटनेबाबत भारत रूद्रवार यांना फोनवरून माहिती दिली. या घटनेमुळे रूद्रवार कुटूंबीय प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. मयत आरती या गर्भवती होत्या असे समजते. दरम्यान, रूद्रवार दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या झाल्याचे रात्री उशीरा समोर आले आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेत त्यांची चार वर्षीय चिमुकली विहा सुखरूप असून सध्या तिला शेजार्यांकडे सोपविण्यात आले आहे.
खा. प्रीतमताई परराष्ट्र मंत्रालयाच्या
संपर्कात
या घटनेबाबत आ. नमिता मुंदडा यांनी खासदार प्रीतमताई मुंडे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी परराष्ट्र मंत्रालयातील अधिकार्यांशी संपर्क साधला. त्यानुसार देशाच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी अमेरिकेतील दूतावासाच्या संपर्कात आहेत.