Site icon लोकाशा-बंब न्यूज

लिंबागणेश परिसरातील गावांना विकास निधी कमी पडु देणार नाही -आ.संदिप क्षीरसागर, गणातील विविध विकास कामांचा शुभारंभ; कामाचा दर्जा आणि गुणवत्ता राखण्याच्या सूचना



बीड, 3 एप्रिल (लोकाशा न्यूज) : लिंबागणेश सर्कलमधील नागरिकांचे प्रेम आणि आशिर्वाद पाठिशी असल्याने संघर्षाची वाटचाल करता आली. लिंबागणेशसह या परिसरातील गावांच्या विकासासाठी आपण प्रयत्नशिल असून रस्ते, वीज, जलसिंचन व मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. कोरोनाच्या संकटाने विकास कामांची गती मंदावली. नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता कोरोना संदर्भातील उपाय योजना करण्यासाठी अधिकचा निधी द्यावा लागला. येत्या काळात लिंबागणेश सर्कलमधील प्रश्न प्राधान्याने सोडवू अशी ग्वाही आ.संदिप क्षीरसागर यांनी दिली आहे. सोमनाथवाडी, बेलगाव, पिंपरनई, पोखरी, लिंबागणेश, मसेवाडी, मुळुकवाडी येथील विकास कामांच्या उद्घाटना दरम्यान ते बोलत होते.
लिंबागणेश पंचायत समिती गणातील सोमनाथवाडी, बेलगाव, पिंपरनई, पोखरी, लिंबागणेश, मसेवाडी, मुळुकवाडी येथील रस्ते सौर पथ दिवे सभागृह आदी विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण कोरोनाचे नियम पाळुन आ.संदिप क्षीरसागर यांनी केले. लिंबागणेश, बोरखेड रस्त्याचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले. यावेळी आ.संदिप क्षीरसागर बोलतांना म्हणाले की, लिंबागणेश परिसरातील गावांना विकास निधी कमी पडू देणार नाही. कामाची गुणवत्ता आणि दर्जा टिकला पाहिजे. विकास कामे पुन्हा-पुन्हा होत नाहीत. या कामांवर नागरिकांनीही दक्ष असायला हवं. येत्या काळात गेल्या तीस वर्षात जी विकास कामे झाली नाहीत ती विकास कामे पुर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहु अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

या गावांमध्ये केली विकास कामांची पाहणी
लिंबागणेश येथील सिमेंट रस्ते, पथ दिवे, गणपती मंदिर परिसरातील विकास कामे, सोमनाथवाडी, बेलगाव, पिंपरनई, पोखरी, मसेवाडी, मुळुकवाडी येथीलही रस्ते व इतर विकास कामांची पाहणी करण्यात आली. लिंबागणेश-बोरखेड या रस्त्याचेही लोकार्पण करण्यात आले. काम दर्जेदार झाले असून या रस्त्यावर संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी डॉ.ढवळे यांच्यासह लिंबागणेश ग्रामस्थांनी आ.संदिप क्षीरसागर यांच्याकडे केली.

जागेवरच विविध प्रश्न मार्गी
कोरोनाचे नियम पाळत आ.संदिप क्षीरसागर लिंबागणेश पंचायत समिती गणातील गावांमध्ये दाखल झाले. ना गर्दी, ना गाजावाजा थेट लोकांमध्ये जात लोकांचे प्रश्न समजून घेत थेट संबंधित अधिकार्‍यांना फोन लावत जागेवरच विविध प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांनी चांगला पायंडा पाडला आहे. ग्रामीण भागातील लोकांना बीडमध्ये येण्यापेक्षा थेट आमदारच लोकांच्या दारात निवडणूक नसतांना ही गेले असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version