Site icon लोकाशा-बंब न्यूज

बलात्कारातील आरोपीसोबत पार्टी करणे भोवले, एसपींनी दोन पोलीस केले तडकाफडकी निलंबित


बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : न्यायालयाने 20 वर्षांची शिक्षा ठोठावलेल्या आरोपीसोबत मद्यपार्टी करणे दोन पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी शुक्रवारी (दि.12) त्या दोघांनाही तडकाफडकी निलंबित केले. या प्रकरणामुळे गुरुवारी (दि.11) पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या प्रकरणाची दखल औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी घेतली होती. निलंबनाच्या कारवाईने बेशिस्त पोलीस अंमलदारांना मोठा दणका बसला आहे.

सहायक फौजदार नामदेव धनवडे व हवालदार सत्यवान गर्जे अशी निलंबित पोलीस अमलदारांची नावे आहेत. बीड ग्रामीण ठाणे हद्दीतील एका गावात तीन वर्षांपूर्वी मतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात 9 मार्च रोजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने तुकाराम ज्ञानदेव कुडूक (27,रा.तिंतरवणी ता.शिरुर) यास 20 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्याला जिल्हा न्यायालयातून जिल्हा कारागृहात दाखल करण्यापूर्वी सहायक फौजदारासह हवालदाराने पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरील एका हॉटेलातील तळमजल्यात रात्री पावणे आठ ते पावणे नऊ या दरम्यान मद्यपार्टी केली होती. माध्यमंांच्या प्रतिनिधींनी वेटरची भूमिका निभावत आरोपीसोबतच्या मद्यपार्टीचे ’स्टिंग ऑपरेशन’ केले होते. यातील सहायक फौजदाराने तुकाराम कुडूक यास जिल्हा कारागृहात रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी दाखल केल्याची नोंद आहे. गुरुवारी (दि.11) यासंदर्भात वृत्तपत्रांनी सदर प्रकरणावर वाचा फोडली होती. खाकी वर्दीच्या अब्रूचे धिंडवडे काढणार्‍या या घटनेने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यासंदर्भात थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे ऑनलाइन तक्रार केली होती. दुसरीकडे पोलीस अधीक्षक आर. राजा व अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते. पोलीस अधीक्षकांनी गृह विभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक उमेश कस्तुरे यांना चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. प्राथमिक अहवाल प्राप्त होताच गुरुवारी रात्री पोलीस अधीक्षकांनी दोन्ही पोलीस अमलदारांच्या निलंबनाचे आदेश दिले. शुक्रवारी (दि.12) संबंधितांना हे आदेश पारित करण्यात आले. निलंबित केलेले दोन्ही पोलीस अंमलदार पोलीस मुख्यालयात नेमणुकीला होते. न्यायालयात आरोपी बंदोबस्त व पैरवी अधिकारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती. मात्र, बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविलेल्या आरोपीची बडदास्त ठेवणे आणि त्यांच्यासोबत खाकी वर्दीवर राजरोस मद्यपार्टी करणे त्यांना भोवले आहे.
Exit mobile version