Site icon लोकाशा-बंब न्यूज

दहा वर्षापासून रखडलेला अल्पसंख्यांक मुलीच्या वसतिगृहाचा प्रश्न लागणार मार्गी, मंत्री नवाब मलिकांकडून जागेवरचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश; आ.संदिप क्षीरसागरांच्या प्रयत्नाला यश


बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : शहरात अल्पसंख्यांक मुलीचे वसतीगृहास दहा वर्षापुर्वी मंजूरी मिळाली, शासनाकडून निधी आला परंतू नगर पालिकेच्या गलथान कारभारामुळे अल्पसंख्यांक मुलीच्या वसतीगृहासाठी जागाच उपलब्ध झाली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही पालिका प्रशासन जागा देण्यास टाळाटाळ करू लागल्याने आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून अल्पसंख्यांक मंत्री नवाबजी मलिक यांच्याकडे पाठपुरावा सुरू केल्यानंतर अल्पसंख्यांक जागेबाबतच्या प्रस्तावाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सने बैठक घेण्यात आली. मंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत अल्पसंख्यांक मुलीच्या वसतीगृहाच्या जागेबाबतचा प्रस्ताव तातडीने दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले असून याबाबत निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही ही त्यांनी दिली आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून पालिका प्रशासनाच्या चुकांमुळे रखडलेला वसतीगृहाचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे.
बीड शहरात अल्पसंख्यांक मुलीचे वसतीगृह उभारण्यासाठी शासन निर्णय क्र.विविअ 2009/प्र.क्र.15/का8 दि.2.03.2010 अन्वये मंजूरी मिळाली. यामध्ये मुलींच्या वसतीगृहासाठी शासकीय जमीन पालिकेने उपलब्ध करून देणे गरजेचे होते. परंतू पालिका प्रशासनाने जाणीवपुर्वक यामध्ये टाळाटाळ करत सदर प्रश्न दहा वर्षापासून रखडत ठेवला. या बाबत आ.संदिप क्षीरसागर यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मंत्री नवाब मलिक यांच्याकडे बैठक लावण्यात यावी अशी विनंती केली होती. कोव्हिड 19 चे वाढते रूग्ण संख्या लक्षात घेता दि.24 फेब्रुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक बोलवण्यात आली. मंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मंत्रालय मुंबई येथूनच पालकमंत्री धनंजय मुंडेसह जॉईन झाले होते तर आ.संदिप क्षीरसागर, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्यासमवेत या बैठकीत सहभागी होते. नगर पालिकेकडून दोन जागा वसतीगृहासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. एक खासबाग आणि दुसरी किल्ला मैदान यापैकी अल्पसंख्यांक समाजाच्या शिष्ट मंडळाच्या मागणीनुसार खासबाग येथील जाग देण्यात यावी अशी मागणी होती. खासबाग येथील जागा देण्यासाठी पालिका टाळाटाळ करू लागल्याने वाद निर्माण झाला आणि पालिकेने सदर प्रश्न दहा वर्षांपासून रखडत ठेवला, न.प.आडत मार्केट परिसरातील जागा देत नसल्याने शिष्ट मंडळाने डाग बंगला येथील जागेची मागणी शिष्ट मंडळाने आ.संदिप क्षीरसागर यांच्याकडे केली होती. यातील योग्य जागेचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश या बैठकीत मंत्री महोदयांकडून देण्यात आले. मंत्री नवाबजी मलिक यांच्याकडून सदर प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा असे आदेश आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासनालय वरळी यांना देण्यात आले असून याबाबत विलंब टाळावा असेही सूचित करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षापासून नगर पालिका आणि पालिकेतील सत्ताधारी जाणीवपुर्वक वसतीगृहाचा प्रश्न टाळाटाळ करत रेंगाळत ठेवत होते. आता आ.संदिप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे सदरील प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याने अल्पसंख्यांक समाजातील शिष्ट मंडळाने आ.संदिप क्षीरसागर यांचे आभार मानले आहेत.

जिल्हाधिकारी, आ.संदिप क्षीरसागर यांच्यासमवेत
शिष्टमंडळाची चर्चा

बीड शहरात अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृहाचा प्रश्न सोडवून प्रत्यक्षात वसतीगृह उभारले पाहिजे यासाठी आ.संदिप क्षीरसागर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. विधानभवनाच्या अल्पसंख्यांक कल्याण समितीचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर सदस्य आहेत. त्या माध्यमातूनही त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवलेला असतांना या प्रश्नी थेट मंत्री नवाब मलिक यांच्या समवेतच बैठक घडवून आणली. ही बैठक सुरू होण्या अगोदर अल्पसंख्यांक समाजाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. यानंतर जिल्हाधिकारी यांच्यासोबतही शिष्ट मंडळाने संवाद साधला. यामध्ये माजी न.प.सभापती खुर्शीद आलम, माजी सभापती अशफाक इनामदार, समाजसेवक जावेद कुरेशी, नगरसेवक जैतुल्ला खान, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष बरकत पठाण, अ‍ॅड.इरफान बागवान, शेख रोईल, बाबा खान, समीर तांबोळी, शेख मेहराज, एवन मुजीब यांच्यासह आदी उपस्थित होते.

Exit mobile version