बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही साथ आटोक्यात येण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हावे यासाठी मास्क वापरत नसणारे नागरिक, सामाजिक अंतराचे पालन न करणार्या व नियमांचा भंग करणार्यांवर कारवाई करावी. कोरोना रुग्णांवर उपचार व तपासण्यांसाठी टेस्टिंग सेंटर्स, कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर सज्ज करावी असे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कोरोना उपाययोजनांबाबत बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. बैठकीस औरंगाबाद विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त (विकास आस्थापना) सुरेश बेदमुथा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार , निवासी उपजिल्हाधिकारी संताष राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गिते , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार , स्वारातीमग्रा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे, डब्ल्यू.एच.ओ. समन्वयक डॉ.अमोल गायकवाड तसेच जिल्ह्यातील तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते. बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना बाबत जिल्ह्यातील नागरिकात सतर्कता वाढणे साठी प्रशासनाने आखलेल्या उपायोजना तात्काळ राबविण्यात याव्यात. दुकानदार, व्यावसायिक, जनतेच्या जास्त संपर्कात असलेले सुपर स्प्रेडर यांना कोरोना तपासणी करून नंतर व्यवसाय-दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली जावी. यासाठी कोरोना तपासणीची मोहीम राबवावी. मंगल कार्यालये, सभागृहे, क्लासेस, गर्दी होणारी बस, वाहने आदी ठिकाणी नियम भंग होत असेल तर कारवाई केली जावी. तसेच रुग्णांवर उपचारांसाठी जिल्ह्यात कोविड केअर सेंटर आणि र्लेींळव-19 रुग्णालये यांची सज्जता करणे गरजेचे आहे. याबरोबर तालुकास्तरावरील यंत्रणेने देखील सक्षमपणे कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी श्री जगताप म्हणाले. उपायुक्त श्री.बेदमुथा यांनी सांगितले, कोरोना साथ वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर व कर्मचार्यांनी अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. यादृष्टीने लसीकरण प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन ती यशस्वी केली जावी. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये असणारी बेड्सची संख्या तसेच वैद्यकीय अधिकारी-कर्मचार्यांची उपलब्धता ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा सज्ज ठेवून येणार्या प्रसंगासाठी तयारी पूर्ण केली जावी. यासाठी जिल्हा रुग्णालय, स्वारातीमग्रा वैद्यकीय महाविद्यालय, लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालय येथे असणार्या सुविधा वैद्यकीय सुविधा कार्यान्वित करण्याची काळजी घ्यावी असे उपायुक्त म्हणाले.