Site icon लोकाशा-बंब न्यूज

पूजाच्या आत्महत्येला संजय राठोड जबाबदार आहेत यात तथ्य वाटत नाही, पूजाच्या भाऊजींचा दावा


उस्मानाबाद : पूजाच्या आत्महत्येला वनमंत्री संजय राठोड जबाबदार आहेत, यात आम्हाला काही तथ्य वाटत नाही, असं पूजा चव्हाणचे भाऊजी शरद राठोड यांनी सांगितलं. तसंच समाजाकडूनही आमच्यावर दबाव नाही, असंही त्यांनी नमूद केलं. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी पूजा पुण्याला का गेली होती? संजय राठोड आणि तिची भेट कधी झाली होती याबाबत भाष्य केलं.
मूळची परळीची असलेल्या पूजा चव्हाणने पुण्यातील वानवडी परिसरात रविवारी (7 फेब्रुवारी) आत्महत्या केली होती. या आत्महत्येला राज्याचे वनमंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यातच संजय राठोड यांचा फोन नॉट रीचेबल असल्यामुळे हे प्रकरण आणखीच तापलं आहे. सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

संजय राठोड यांचा हात असल्याचं वृत्तात तथ्य नाही
याबाबत एबीपी माझाने पूजा चव्हाणच्या बहिणीचे पती अर्थात तिचे भाऊजी शरद राठोड यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पूजाच्या आत्महत्येमागे संजय राठोड यांचा हात असल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, जर असं काही असतं तर तिने आईला, बहिणीला किंवा मला कोणालातरी सांगितलं असतं किंवा मोबाईलमध्ये काही पाठवलं असतं. पण तिने आम्हाला तसं काही सांगितलेलंच नाही. फोनवर बोलताना सगळं ठीक आहे, असंच सांगायची. ती मनात काही ठेवायची नाही. सोशल मीडियात जे काही सुरु आहे त्यावर काही बोलायचं नाही. सविस्तर चौकशीत खरं काय ते समोर येईल.

वाघीण होती, आई-वडिलांचा आधार होती : शरद राठोड
पूजा पुण्याला शिकायला गेली होती. आई-बापाला ती मुलासारखीच होती. सगळं घर तिच्यावर होतं. रविवारी रात्री तीन वाजता माझ्या पत्नीला फोन आला की पूजा पडली. तिचे आई-वडील रात्रीच निघाली, आम्ही अंबाजोगाईमधून सकाळी निघालो. ससून हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे दोन मुलं सोबत होती. पूजाचं पार्थिव घेऊन रात्री बीडला परतलो, असं शरद राठोड यांनी सांगितलं.

शरद राठोड पुढे म्हणाले की, पूजाच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव आल्याचं सोशल मीडियावरुनच आम्हाला समजलं. आम्ही दु:खात आहोत, तणावात आहे. ती वाईट वागणार नाही असा विश्वास आहे. तिची बदनामी सुरु आहे. जर काही असतं तर तिने आम्हाला सांगितलं असतं. शिवाय सुसाईड नोटही सापडली नाही. ती वाघीण होती, आई-वडिलांचा आधार होती.

पूजा आणि संजय राठोड यांची भेट कुठे झाली?
पूजाच्या आत्महत्या प्रकरण संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर, त्या दोघांची भेट नक्की कुठे झाली, असा प्रश्न शरद राठोड यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, समाजाचा मेळावा घेतला होता, त्या कार्याक्रमानिमित्त मीटिंग घेतल्या होत्या, तेव्हाच भेट झाली होती, बाकी आम्हाला काही माहित नाही. सोशल मीडियावरच संजय राठोड यांच्याबद्दल वाचतोय, पण पूजाने कधी याबाबत माहिती दिली नाही, काही अडचण असती तर तिने सांगितलं असतं.

कुक्कुटपालन व्यवसायात पूजाची वडिलांना मदत
पूजाचे वडील कुक्कुटपालन करतात. बँकेतून 25 लाखांचं लोन काढून कुक्कुटपालनाच्या व्यवसायात ती वडिलांना मदत करत होती. पूजासह एकूण पाच बहिणी आहेत. त्यापैकी चार बहिणींचं लग्न झालं आहे. पूजा पाचवी मुलगी आणि सहावी आणखी एक मुलगी आहे. पूजाचं बीएड झालं होतं आणि पुढचा कोर्स करण्यासाठी ती पुण्याला गेली होती. पण कायमस्वरुपी आम्हाला निघून गेली, असं शरद राठोड यांनी सांगितलं.

अरुण राठोड कोण आहे?
व्हायरल ऑडिओ क्लिपमधल्या संवादात अरुण राठोड नावाचा उल्लेख होता. हा अरुण राठोड कोण याबाबत शरद राठोड यांनी सांगितलं की, अरुण राठोड कार्यकर्ता नसून तो परळीतला आहे. तो पूजाच्या भावासारखा आहे. तो पुण्याला शिकायला होता. पूजाही तिथेच राहत असावी.

सोरायसीसमुळे पूजा तणावात
पूजाला दोन वर्षांपासून सोरायसीस आजार होता. आजारामुळे ती टेंशन घ्यायची, असं शरद राठोड यांनी सांगितलं.

Exit mobile version