बीड (प्रतिनिधी) जिल्हा नियोजन व राज्य दलित वस्ती विकास निधीअंतर्गत बीड शहरासाठी विकास निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच नाळवंडी जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत रस्त्यांसाठी भरीव निधी द्यावा या मागणीसाठी गुरुवारी (दि.11) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली.
या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पालिका गटनेते फारुख पटेल, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रेमचंद (बाबुशेठ) लोढा, यांच्यासह नगरसेवक अमर नाईकवाडे उपस्थित होते.
बीड शहरातील प्रलंबित विकास कामे गतीने मार्गी लागणे किती आवश्यक आहे याबाबत पदाधिकार्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी विस्ताराने चर्चा केली. जिल्हा नियोजन व राज्य दलित वस्ती विकास निधीअंतर्गत बीड शहरासाठी विकास निधी उपलब्ध करून दिल्यास सर्व रखडलेली कामे मार्गी लागतील, तसेच बीड शहरालगतच्या रामनगर, जालना रोड ते बार्शी नाका मार्गे बाह्यववळण रस्त्यावरील पॅचवर्कचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणीही पालकमंत्री मुंडे यांच्याकडे करण्यात आली. मागण्यांचे सविस्तर निवेदन यावेळी पालकमंत्री मुंडे यांना देण्यात आले.