Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडमधील मुलींच्या वस्तीगृहासह अल्पसंख्यांक सामाजाचे प्रश्न आ.संदिप क्षीरसागरांनी राजधानीत मांडले, तात्काळ अहवाल सादर करण्याचे समितीकडून निर्देश


बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : शहरात अल्पसंख्यांक मुलींच्या वस्तीगृहासाठी निधी उपलब्ध असतांना बीड नगर परिषदेकडून जागा दिली जात नसल्याने सदर वस्तीगृहाचे काम रखडलेले आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या मागणीनुसार बीड शहरात अल्पसंख्यांक मुलींचे वस्तीगृह उभारण्यात यावे याबाबत तातडीने अहवाल मागविण्यात यावा अशी मागणी करत अल्पसंख्यांक समाजासाठी असलेल्या कल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहचल्या पाहिजेत यासाठी जिल्हास्तरावर कार्यशाळा घेण्यात याव्यात अशी मागणी आ.संदिप क्षीरसागर यांनी करत अल्पसंख्यांक समाजाचे विविध प्रश्न महाराष्ट्र विधान मंडळाच्या कल्याण समिती समोर मांडली. बीड शहरातील अल्पसंख्यांक मुलींच्या वस्तीगृहासह विविध प्रश्ना संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश समितीने दिले आहेत.
महाराष्ट्र विधान मंडळाच्या अल्पसंख्यांक कल्याण समितीची प्रारंभीक बैठक बुधवार दि.27 जानेवारी 2021 रोजी दुपारी 1 वाजता कक्ष क्र.801 आठवा मजला विधानभवन मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत अल्पसंख्यांकाच्या कल्याणासाठी राबविण्यात येणार्‍या विविध कल्याणकारी योजने संदर्भात संगणकीय सादरीकरण करण्यात आले. या बैठकीला समितीचे अध्यक्ष आ.आमीन पटेल, आ.रविंद्र वायकर, आ.शहाजी बापु पाटील, आ.मकरंज जाधव पाटील, महादेव जानकर, आ.जिशान सिद्दीकी, आ.कांशीराम पावरा, आ.कॅप्टन सेलवन, आ.कुमार आईलानी, आ.नरेंद्र भोंडेकर, आ.गिता जैन, आ.वजाहत मिर्जा आदी सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी आ.संदिप क्षीरसागर यांनी समितीचे सदस्य म्हणून अल्पसंख्यांक समाजाचे विविध प्रश्न या बैठकीत मांडले. बीड शहरातील अल्पसंख्यांक मुलींच्या वस्तीगृहाचा रखडलेला प्रश्न मांडल्यानंतर समितीने यावर तातडीने अहवाल मागवून कार्यवाही करण्याचे निर्देश अल्पसंख्यांक विभागाला दिले आहेत. अल्पसंख्यांक विभागाच्या कल्याणासाठी असलेल्या योजना सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हास्तरावर या योजनांबाबत जनजागृती व कार्यशाळा घेण्यात यावी अशी मागणीही आ.संदिप क्षीरसागर यांनी यावेळी केली. समितीचे अध्यक्ष आमीन पटेल यांनी आ.संदिप क्षीरसागर यांच्या मागण्यांची दखल घेत जिल्हास्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे व लोकप्रतिनिधींना कार्यशाळेस बोलवून विविध योजना सामान्यांपर्यंत पोहचल्या पाहिजेत अशा सूचनाही प्रशासनाला यावेळी करण्यात आल्या. यावेळी अल्पसंख्यांक विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

विविध योजनांच्या जिल्हास्तरावर कार्यशाळा
लोकप्रतिनिधींना बोलवले जाणार
बीड येथील जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक समितीच्या बैठकीचे निमंत्रण स्थानिक आमदारांना देण्यात आले नव्हते. तरी देखिल विरोधकांनी स्थानिक आमदार बैठकीला उपस्थित नसल्याच्या कारणावरून राजकारण केले होते. यावर कोणती टिपणी न करता आ.संदिप क्षीरसागर यांनी अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न मुंबईत झालेल्या बैठकीत पोटतिडकीने मांडल्याचे दिसते. अल्पसंख्यांक समाजासाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती व कार्यशाळा जिल्हास्तरावर घेण्यात याव्यात अशी मागणी आ.संदिप क्षीरसागर यांनी केल्यानंतर त्याची दखल घेवून समितीने जिल्हास्तरावर कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. अल्पसंख्यांक विभागाच्या कार्यशाळेचे निमंत्रण स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधींना देण्याचे बंधनकारक केले असल्याचे सांगण्यात आले आहे. या कार्यशाळांमुळे अल्पसंख्यांक समाजासाठी असलेल्या विविध योजना थेट सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मदत होणार आहे.

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी एक हजार कोटी
अल्पसंख्यांक विभागा अंतर्गत असेलल्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी एक हजार कोटीची तरतूद करण्यात यावी असा एकमुखी निर्णय अल्पसंख्यांक समितीच्या वतीने घेण्यात आला. येत्या अधिवेशनामध्ये 1 हजार कोटीची तरतूद करण्यात यावी यासाठी अल्पसंख्यांक समितीचे सर्व सदस्य मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भेटणार आहे.

वक्फ बोर्डाचे 216 पदे भरली जाणार

महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण औरंगाबाद येथील अनेक पदे रिक्त आहेत. 106 पदे मंजूर असली तरी ती पदे भरल्या गेली नाहीत तर 216 पदे प्रस्तावित करण्यात आली आहेत. 216 प्रस्तावित करण्यात आलेली पदे यास शासनाने मंजूरी द्यावी असा ठराव अल्पसंख्यांक कल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून या बाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याने 216 पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे दिसते.
Exit mobile version