माजलगांव । दि. २६।
नेतेपदाचा सर्व बडेजाव बाजूला सारून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज एका रसवंती गृहात जाऊन ऊसाच्या मधुर रसाचा आस्वाद घेतला, त्यांच्या अचानक येण्याने रसवंती गृहाचा मालकही क्षणभर थबकला, परंतू नंतर पंकजाताई यांचे मोठया उत्साहात त्यांनी स्वागत केले.
झाले असे, पंकजाताई मुंडे आज माजलगाव दौर्यावर होत्या. सकाळी वैद्यनाथ साखर कारखान्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करून त्या माजलगाव कडे रवाना झाल्या. तेलगांवच्या पुढे अचानक त्यांच्या वाहनाचा ताफा टालेवाडी फाटा येथील ‘गारवा’ रसवंतीगृहा समोर थांबला. गाडीतून उतरून पंकजाताई थेट रसवंतीगृहात शिरल्या, अचानक पंकजाताईंना समोर पाहून रसवंतीगृहाचे मालक गणेश बडे आश्चर्यचकित झाले, त्यांना अतिशय आनंद झाला. मोठया उत्साहात स्वागत करून त्यांनी पंकजाताई यांचेसमोर ऊसाचा ताजा रस काढून दिला, पंकजाताई यांनी देखील त्याचा आस्वाद घेतला. पंकजाताई यांनी यावेळी त्यांची आस्थेवाकपणे चौकशी केली व ऊसाच्या मशिनरीची पाहणी केली.
नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी या दौऱ्यावेळी ठिकठिकाणी ग्रामपंचायत सदस्यांचे सत्कार केले. चोपनवाडी, पात्रूड, नित्रूड, भोपा, कासारी बोडखा आदी ठिकाणी त्यांनी सदस्यांचे सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी ग्रामस्थांनी गावच्या समस्याही त्यांचेसमोर मांडल्या.
••••