नाशिक, दि. 25 (लोकाशा न्यूज) :- नाशिकमध्ये होणार्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साहित्य मंडळाने केलेली माझी निवड हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. काल स्वागताध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी त्यांची भेट घेऊन सन्मान केला.
या बैठकीला माजी आमदार तथा विश्वस्त हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, अॅड. विलास लोणारी, डॉ.कैलास कमोद, संजय करंजकर, शंकर बोर्हाडे, सुभाष पाटील, गिरीश साळवे, मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. स्वागताध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देतांना छगन भुजबळ म्हणाले की, कविवर्य कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांनी वास्तव केलेल्या पुण्यभूमीत यंदा मराठी साहित्यिकांचा मेळा भरत आहे. याचा एक नाशिककर म्हणून मला अतिशय आनंद आहे. तसेच या संमेलनाच्या अध्यक्षपदी आपण ज्येष्ठ शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ.जयंत नारळीकर यांची निवड केली आहे. या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आपण माझी निवड करण्यात आली हा माझ्यासाठी मी सर्वोच्च असा सन्मान समजतो असे म्हटले आहे. तसेच नाशिकमध्ये होणारे हे साहित्य संमलेन नक्कीच ऐतिहासिक होईल यात कुठलीच शंका नाही. नाशिककर म्हणून या अगोदरच आपण जबाबदारी स्विकारली आहे. आता स्वागताध्यक्ष म्हणून आपण माझ्यावर सोपवलेली जबाबदारी स्विकारण्यास मी तयार असून नाशिकमध्ये येणार्या प्रत्येक पाहुण्याचे, साहित्यिकाचे व मराठी भाषेवर प्रेम करणार्या तमाम नागरिकांचे या नाशिक नगरीत स्वागत करण्यास आपण कुठलीही कमतरता राहू देणार नाही. तसेच आपणा सर्वांच्या सोबतीने हे मराठी साहित्य संमलेन उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले जाईल असा विश्वास व्यक्त करतो असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. यावेळी बोलतांना माजी आमदार हेमंत टकले म्हणाले की, साहित्य क्षेत्राची आवड असलेले आणि समाजसेवी व्रत जोपासणारे व्यक्ती म्हणून नाशिक येथे होणार्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या स्वागताध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली आहे. आपली झालेली ही निवड आमच्यासाठी अंत्यत आनंदाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.