Site icon लोकाशा-बंब न्यूज

केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या हिताचं सरकार – पंकजाताई, ताई म्हणाल्या ‘‘त्यावेळी मुंडे साहेबांनी तर आता खा. प्रीतमताईही संसदेत ओबीसी जनगणणेवर आवाज उठवित आहेत’’


औरंगाबाद, दि. 25 जानेवारी : शेतकरी आंदोलनाबाबत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी केंद्र सरकार हे शेतकर्‍यांचंच सरकार आहे. शेतकर्‍यांच्या हिताचेच निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतले आहेत आणि आताही सरकार शेतकर्‍यांशी चर्चेची तयारी दाखवत आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्‍नावरही यावेळी पंकजाताईंनी प्रतिक्रिया दिली आहे. तो विषय आता मागे पडला आहे. तरीही त्यावर परत परत बोलावं लागू नये म्हणून तुम्ही आता आलाच आहात तर सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं मी कधीही समर्थन करू शकत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्या औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. कुठल्याही एका गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा त्या कुटुंबातील ज्यांचा काही दोष नाही अशा लहान मुलांना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. सहाजिक एक नातं म्हणून आणि महिला म्हणून मी याकडे संवेदनशीलपणे बघते. हा विषय कोणाचाही असता तरी मी त्याचं राजकीय भांडवल केलं नसतं आणि आताही करणार नाही. यात संवेदनशीलपणे विचार करायला हवा. ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा भविष्यात निकाल लागेलच, असं त्या यावेळी म्हणाल्या. त्याचबरोबर ओबीसींची जनगणना झाली पाहिजे ही भूमिका गोपीनाथ मुंडे साहेबांनीही वेळोवेळी मांडली आहे. संसदेत मांडली आहे आणि खासदार प्रीतमताईंनीही याबाबत आवाज उठवला आहे. आता जनगणना होणार आहे. त्यामुळे जातीनिहाय जनगणना व्हायलायच हवी यातून प्रत्येक गोष्टी रडारवर येतील आणि स्पष्ट होतील. आपल्याला त्या समूदायाला न्याय देताना मदत होईल, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

Exit mobile version