Site icon लोकाशा-बंब न्यूज

मल्टीस्टेटच्या अध्यक्षास पिस्तूल लावून मागितली पाच लाखाची खंडणी, बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल

बीड, : कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून वाहनचालकाने साईराम अर्बन मल्टीस्टेच्या अध्यक्षास पिस्तूलचा धाक दाखवून पाच लाखांची खंडणी मागितली. याबाबतची माहिती मिळताच शहर पोलिसांनी बँकेत धाव घेत अवघ्या पाच मिनिटांत त्याला ताब्यात घेतले. शनिवारी (दि.२३) सायंकाळी पाच वाजता माळीवेस येथे हा थरार घडला.
हरिपाल सोपान नागरगोजे (४०,रा.रोहतवाडी ता.पाटोदा) असे त्या आरोपीचे नाव आहे. तो श्री. साईनाथ अर्बन मल्टीस्टेटचे अध्यक्ष साईनाथ परभणे यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करत होता. मात्र, तो कामात कुचराई करत असल्याने त्यास कामावरुन कमी केले होते. त्यामुळे तो सोशल मीडियावर मल्टीस्टेट व परभणे यांच्याविरुध्द आक्षेपार्ह पोस्ट करत असे. अशातच शनिवारी सायंकाळी पाच वाजता तो पिस्तूलसह मल्टीस्टेटमध्ये घुसला. थेट परभणे यांच्या दालनात घुसून त्याने ‘पाच लाख दे अन्यथा जीवे मारीन’ अशी टोकाची धमकी दिली. त्यामुळे परभणे भयभीत झाले. शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवि सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मुस्तफा शेख,सहायक फौजदार नरेश चक्रे,पो.ना.महेश जोगदंड, अस्लम पठाण, सुदर्शन सारणीकर यांनी मल्टीस्टेटमध्ये धाव घेत नागरगोजे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून जप्त केलेली पिस्तूल छर्ऱ्याची असल्याचे निष्पन्न झाले. परभणे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद झाला. रविवारी न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

Exit mobile version