राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर पहिल्यांदा भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिलीय. गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे या विषयावर बोलण्यास टाळाटाळ करत होत्या. अखेर पंकजा मुंडेंनी आज यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. तो विषय बर्यापैकी मागे पडलेला आहे. तरीही याच्यावर परत परत बोलावं लागू नये म्हणून तुम्ही आलाच आहात, तर सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्त्विकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी कधीही करू शकत नाही, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्यात.
कुठल्याही एका गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा कुटुंबात ज्यांचा काही दोष नाही, त्या कुटुंबातील मुलांना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. मी महिला म्हणून या गोष्टीकडे संवेदनशीलतेने बघते. हा विषय कोणाचाही असता तरी त्याचं राजकीय भांडवल मी केलं नसतं. आणि आताही करणार नाही. यात संवेदनशील पद्धतीनं विचार करायला हवा. ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा भविष्यात निकाल लागेलच, असंही पंकजा मुंडेंनी अधोरेखित केलंय.
रविवारी जालन्यात ओबीसी मेळावा घेत ओबीसी समाजाने आणि सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं होतं. मात्र या मेळाव्याला पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली नव्हती. मात्र त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करून भाजपला काही आश्वासनांची आठवण करून दिली होती. आज याच मुद्द्यावर औरंगाबादमध्ये बोलताना ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, असं म्हणत आमची ही पूर्वीपासूनची मागणी असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. तसंच ओबीसींच्या जनगणेबरोबरच जातीय जनगणना झाली पाहिजे, असं सांगताना त्या समााजाचे प्रश्न त्यामुळे मार्गी लागतील, असंही मुंडे यांनी सांगितलं. “काही दिवसांत जनगणना होणार आहे. या जनगणनेत ओबीसींसह जातीय जनगणना व्हावी. म्हणजे सगळ्यांची ताकद किती आहे हे कळेल. तसंच त्यांचे प्रश्न कळतील, सरकारलाही त्यावर उपापयोजना करायला सोपं जाईल”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
कोणत्याही कार्यक्रमाला फिजीकल उपस्थितीपेक्षा वैचारिक उपस्थिती गरजेची: पंकजा मुंडे
“दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनीही ओबीसी जनगणनेचा मुद्दा संसदेत मांडला होता. या मुद्द्यांवर त्यांनी संसदेत आवाज उठवला होता. आता खासदार प्रीतम मुंडे या देखील संसदेत या मुद्यावर बोलत आहेत. त्यामुळे मुंडे साहेबांपासून ते आतापर्यंत आमची मागणी जुनीच आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. जालन्यातल्या ओबीसी मेळाव्याच्या अनुपस्थितीच्या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “कोणत्याही कार्यक्रमाला फिजीकल उपस्थितीपेक्षा वैचारिक उपस्थिती गरजेची असते. आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून किंवा चळवळीच्या माध्यमातून ओबीसींच्या प्रश्नावर काम करत आलो आहोत”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
मला थोडं बाजूला ठेवा!
रविवारच्या जालन्याच्या ओबीसी मेळाव्यात यापुढचा मुख्यमंत्री ओबीसी अ्सावा, अशी गर्जना झाली. याच मुद्द्यावर पंकजांना विचारलं असता, त्यांनी सावध पवित्रा घेत यापासून मला थोडं बाजुला ठेवा कारण ही चळवळ मला कोणत्याही पदासून लांब राहून लढायची आहे, असं त्या म्हणाल्या.
पंकजांकडून ‘कुछ वादें’ची आठवण
पंकजा मुंडे यांनी आज एक ट्विट करून भाजपला जुन्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे. आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. आमचीही गणना करा. ओबीसींची जनगणना आवश्यक आहे आणि गरजही आहे. कुछ यादे और कुछ वादे, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी हिंदीत हे ट्विट केलं आहे. दिल्लीतील भाजपच्या नेत्यांना आपण काय लिहिलं हे समजण्यासाठीच त्यांनी हिंदीत हे ट्विट लिहिलं असावं, असं राजकीय जाणकार सांगतात.