गेवराई : येथील लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टच्या मालकीच्या जमीन मिळकतीचे बनावट दस्तावेज आणि ऑडीट रिपोर्ट तयार करून रकमेची अफरातफर केली, खोटे हिशोब दिले आणि ट्रस्टच्या जमीन, उत्पन्नाचा उपभोग घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून गेवराईचे माजी नगराध्यक्ष राधेशाम श्रीराम अट्टल, त्यांची दोन मुले अनुपम आणि अनिकेत, लक्ष्मीनारायण श्रीराम अट्टल व प्रल्हाद गणपतराव खटावकर या पाच जणांवर गेवराई ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी गेवराई तालुक्यातील कोल्हेर येथील शाळीकराम अंबादास चक्कर यांनी तक्रार दाखल केली आहे. राधेशाम अट्टल, मुले अनुपम आणि अनिकेत व भाऊ लक्ष्मीनारायण हे गेवराई येथील लक्ष्मीनारायण मंदिराचे विश्वस्त आहेत. अट्टल कुटुंबाने मंदिराच्या देखभालीसाठी लुखामसला आणि कोल्हेर येथील जमीन दान केलेली आहे. १९७२ साली सदरील जमिनीचा ट्रस्टच्या नावाने सातबारावर फेर देखील ओढण्यात आला. मात्र त्यानंतर राधेशाम, अनुपम, अनिकेत, लक्ष्मीनारायण अट्टल आणि त्यांचा नोकर प्रल्हाद खटावकर यांनी महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे मालकी रकान्यातून ट्रस्टचे नाव काढून त्या ठिकाणी राधेशाम अट्टल आणि मयत रामप्रसाद भगवानदास अट्टल यांचे नाव लावून घेतले असे आरोप शाळीकराम यांनी केले आहेत. तसेच ट्रस्टच्या उत्पन्नातही अट्टल यांनी अफरातफर केली. ट्रस्टच्या लुखामसला आणि कोल्हेर येथील शेत जमिनीत ४० ते ५० एकर ऊस असून त्यांचे अंदाजे उत्पन्न ४० लाख रुपये आहे. असे असतानाही १९८४ ते २०१८ या कालावधीत सदरील उत्पन्न कागदोपत्री कमी दाखविले. तसेच राधेशाम अट्टल यांनी बंकटस्वामी महाराज खाजगी धार्मिक ट्रस्टच्या माकीच्या कोल्हेर येथील शेतातील ऊस, गहू, कापुस, ज्वारी या पिकाची चोरी करुन परस्पर विक्री केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. सदर तक्रारीवर गेवराईचे कार्यकारी दंडाधिकारी यांनी आदेशित करून पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने शाळीकराम चक्कर यांनी अखेर न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार राधेशाम श्रीराम अट्टल, अनुपम आणि अनिकेत अट्टल, लक्ष्मीनारायण श्रीराम अट्टल व प्रल्हाद गणपतराव खटावकर या पाच जणांवर गेवराई ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक साबळे करत आहेत. या घटनेमुळे गेवराई शहरात खळबळ उडाली आहे.