Site icon लोकाशा-बंब न्यूज

मुख्यमंत्री येडीयुरप्पांच्या गृह जिल्ह्यात भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू

बंगळुरू – कर्नाटकच्या शिवमगा येथील एका रेल्वे क्रशर साईटवर गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला. शिवमोगाच्या अब्बालगेरे गावाजवळ एका ट्रकमध्ये हा भीषण स्फोट झाला असून 8 मजुरांचा मृत्यू झाला आहे. या ट्रकमधून काहीजण जिलेटीनच्या काड्या घेऊन जात होते, असे स्थानिक मीडिया प्रतिनिधींकडून सांगण्यात आलंय. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.
स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, जवळील घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. आत्तापर्यंत पोलिसांनी 8 जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. यासदंर्भात माहिती मिळताच, स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून जिल्हाधिकारी यांनी परिसराला घेराव घालण्याचे आदेश दिले आहेत. शिवमोगा शहरापासून 5 ते 6 किमी अंतरावर हा स्फोट घडला असून आम्ही अलर्ट असल्याचं जिल्हाधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, ट्रकमध्ये स्फोट झाला की ट्रकच्या बाहेर जवळच याबाबत खात्री देण्यात येत नाही, त्यामुळे पोलीस तपासातच ही बाब उघड होईल. दरम्यान, शिवमोगा हा कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा गृह जिल्हा आहे. दरम्यान, स्फोटाची तीव्रता आणि आवाज ऐकून अनेकांना हा भूकंप असल्याचे वाटले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. शिवमोगाच्या दुर्घटनेच वृत्त ऐकून प्रचंड वेदना झाल्या. पीडित कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. राज्य सरकार सर्वोतोपरी मदत पुरविण्यास सज्ज आहे, असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. स्फोटाच्या आवाजामुळे स्थानिक परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे, हा आवाज ऐकून लोकं घराबाहेर पळत सुटले. कारण, हा भूकंप तर नाही ना, असा समज नागरिकांमध्ये झाला होता. त्यामुळे, घराबाहेर येऊन एकमेकांशी चर्चा करत होते.

Exit mobile version