Site icon लोकाशा-बंब न्यूज

विनाकारण रजा टाळा, जनतेला न्याय मिळेल असे काम करा, पाच तासाच्या बैठकीतून जिल्हाधिकार्‍यांनी एसडीओ आणि तहसिलदारांना दिले कडक आदेश


बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : मंगळवारी बदली, बुधवारी पदभार स्विकारल्यानंतर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी गुरूवारी महसूल विभागातील अधिकार्‍यांची येथील नियोजन विभागाच्या सभागृहात तब्बल पाच तास आढावा बैठक घेतली, विनाकारण रजा टाकू नका, जनतेचे विषय, त्यांचे प्रश्‍न समजून घ्या, आणि ते गतीने मार्गी लावा , अशा कडक शब्दात जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित एसडीओ आणि तहसिलदारांना आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे यावेळी प्रलंबित कामावरून त्यांनी काही तहसिलदारांनाही चांगलेच फैलावर घेतले होते.
दप्तर दिरंगाईमुळे वर्षानुवर्षे सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही, त्यांचे प्रश्‍न सुटत नाहीत, हे आपल्या डोळ्यांनी स्वत: जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी पाहिलेले आहे. या संदर्भात आलेले अनेक अनुभव त्यांनी बुधवारी सायंकाळी तात्कालिन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात सांगितले होते. वास्तविक पाहता आपण  आपल्या सेवेच्या माध्यमातून नागरिकांना खर्‍या अर्थाने न्याय देवू शकतो, त्यांचे प्रश्‍न सोडवू शकतो, अगदी हीच विचारसरणी घेवून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप हे काम करीत आहेत. त्यामुळे त्यांनी काल महसूल विभागाच्या आढावा बैठकीत आपल्या अधिकार्‍यांना कामासंदर्भात अनेक मंत्र दिले. जनतेची कामे समजून घ्या, विनाकारण रजा टाकू नका, गावात जावून रोजगार हमीची कामे तपासा, त्यासाठी शिवार फेरी काढा, चांगल्या पध्दतीने आराखडा तयार करा, लोकांची गरज लक्षात घ्या, अशा कडक शब्दात त्यांनी यावेळी अधिकार्‍यांना आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे प्रलंबित कामामुळे यावेळी त्यांनी अनेक तहसिलदारांनाही चांगलेच फैलाव घेतले होते. पाच तास झालेल्या या बैठकीला बीडचे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, श्रीकांत गायकवाड यांच्यासह इतर अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

Exit mobile version