बीड(वार्ताहर) : सेवानिवृत्त सैनिकाच्या तक्रारीवरुन परळीच्या सहायक निबंधकांनी छापा टाकून एका खासगी सावकाराच्या घरातून मुद्रांकांसह धनादेश जप्त केले. ही कारवाई बुधवारी (दि.२०) अंबाजोगाई येथील प्लॉवर्स क्वार्टर परिसरात करण्यात आली. या प्रकरणी सावकार पिता-पुत्रावर शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
चनई (ता.अंबाजोगाई) येथील माजी सैनिक शेख गुलाब शेख बाबू यांनी खासगी सावकाराविरुध्द जिल्हा निबंधकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार खासगी सावकार घनश्याम घोबाळे हा अवाच्या सव्वा व्याज लावून जागा हडप करु पाहत असल्याचे नमूद होते. या तक्रारीआधारे कारवाईचे आदेश जिल्हा निबंधकांनी दिले. परळी येथील सहायक निबंधक नितीन पंडित यांचे पथक यासाठी स्थापन करण्यात आले होते. पंडित यांच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने बुधवारी घनश्याम एकनाथ घोबाळे (रा. फ्लॉवर्स क्वार्टर, अंबाजोगाई) याच्या घरावर छापा टाकला. सहायक निबंधक नितीन पंडित यांच्या फिर्यादीवरुन घनश्याम एकनाथ घोबाळे व विशाल घनश्याम घोबाळे यांच्याविरुध्द महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९ व कलम ४५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सहायक निबंधक पंडित यांच्यासह सहकार अधिकारी एस.एम.वाव्हळे,एस.ए.डावकर,सहायक सहकार अधिकारी
आर.जी.तडवळकर, शिपाई एच.एम. पठाण व शहर ठाण्यातील पोलीस अंमलदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सुटकेस भरुन कागदपत्रे
घोबाळे याच्या घरातील एका सुटकेसमध्ये सात जणांचे मुद्रांक, खरेदी खत,धनादेश व इतर टिपण्या आढळून आल्या. या टिपण्यात व्याजाने दिलेल्या रक्कमेच्या नोंदीही आढळल्या. या सर्व कागदपत्रांवरुन घोबाळे हा अवैध सावकारीचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले.