Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडसह केज मतदार संघातील पोल्ट्री व्यावसायिकांना तात्काळ आर्थिक मदत द्या; आ. नमिता मुंदडांसह अक्षय मुंदडांनी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्र्यांकडे केली मागणी


अंबाजोगाई, दि. 19 (लोकाशा न्यूज) : राज्यात पसरलेल्या बर्ड फ्ल्यूच्या साथीमुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले आहेत. बीडबरोबरच केज मतदार संघातील काही गावात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर हजारो कोंबड्यांचे कलिंग करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. बर्ड फ्ल्यूच्या भीती मुळे कुक्कुटपालन व्यवसाय ठप्प झाला असून व्यावसायिक प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे बीड, केज मतदार संघातील पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक मदत देऊन अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी विनंतीवजा मागणी आ. नमिता मुंदडांसह भाजपचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन केली आहे. त्यांच्या या मागणीला नक्कीच यश मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात कोरोना संसर्गासाठी कोंबड्या जबाबदार असल्याची अफवा उठली होती. त्यामुळे कुक्कुट पालन व्यवसायाला उतरती कळा लागली होती. या धक्क्यातून हा व्यवसाय सावरत असतानाच बर्ड फ्ल्यू आला. केज विधानसभा मतदार संघातील लोखंडी सावरगाव येथे बर्ड फ्ल्यूचा संसर्ग आढळून आल्यानंतर जवळपास दीड हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. तसेच, दहा किलोमीटर परिसरातील कोंबड्यांची खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला. या परिसरातील 80 पोल्ट्री शेड मधील हजारो कोंबड्या विक्री विना पडून आहेत. या पक्षांच्या देखभालीसाठी प्रचंड खर्च येतो, परंतु विक्री ठप्प असल्याने पैसे नाहीत अशा दुहेरी कात्रीत कुक्कुट व्यावसायिक सापडले आहेत. कुक्कुट व्यावसायिकांनी या प्रश्नावर एकत्र येत सोमवारी आ. नमिता मुंदडा यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी मंगळवारी (दि.19) मुंबईत पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन पोल्ट्री व्यावसायिकांना होत असलेल्या आर्थिक नुकसानीबद्दल चर्चा केली आणि त्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली. त्यावर मंत्री सुनील केदार यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन मुंदडा यांना दिले.

Exit mobile version