Site icon लोकाशा-बंब न्यूज

परळीत डीएम जिंदाबाद, गेवराईत भैय्यासाहेबांचा दबदबा, माजलगावात दादांची राष्ट्रवादी पिछाडीवर तर मादळमोहीत बप्पासाहेब तळेकर शून्यावर बाद

बीड -जिल्ह्यातील 11 तालुक्यात 111 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले. त्याचे सोमवार दि.18 जानेवारी रोजी मतमोजणी दरम्यान हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेसची विजयी घोडदौड सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या गटानं परळीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. परळी तालुक्यातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये भाजपला दारुण पराभावाला सामोरं जावं लागले आहे. परळी तालुक्यातील 8 पैकी 6 ग्रामपंचायतींवर धनंजय मुंडे यांच्या गटानं विजय मिळवला. परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या गटानं पुन्हा एकदा वर्चस्व दाखवून दिल असल्याने सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा दबदबा कायम राहिला. तर गेवराई तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांचा वर्चस्व राहिला असून तलवाड्यातून सुरेश हात्ते आणि मादळमोहीतून बप्पासाहेब तळेकर या दोन मातब्बरांना मतदारांनी मोठा हिसका दिला आहे. बीड तालुक्यात दुपारपर्यंत बारा ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात गेल्या आहेत.

 जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास आघाडी २, अपक्ष १ ठिकाणी सत्तेत आला असून तलवाडा ग्रामपंचायतीत २० वर्षांपासून वर्चस्व राखून असलेले सुरेश हात्ते यांच्या पॅनलला अवघ्या दोन जागा मिळाल्या. या ठिकाणी महाविकास आघाडी १५ जागा घेऊन बहुमतात आली तर बप्पासाहेब तळेकरांचं वर्चस्व असलेल्या मादळमोहीत दिपक वारंगे यांच्या सर्वच्या सर्व १७ जागा बहुमताने विजयी झाल्या. या ठिकाणी तळेकरांना जबरदस्त हादरा मतदारांनी दिला. गेवराई तालुक्यावर पुन्हा एकदा माजी आमदार अमरसिंह पंडितांचे वर्चस्व ग्रा.पं.निवडणुकीच्या माध्यमातून दिसून आले.
गेवराई तालुक्यातील एकूण २२ ग्रामपंचायतींसाठी निवडणुक होऊन २१ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होेते. त्यापैकी गोविंदवाडी ही ग्रामपंचायत बिनविरोध होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आ. अमरसिंह पंडित यांचे गेवराई तालुक्यावर पुन्हा एकदा वर्चस्व राहिले असून या निवडणुकीत मादळमोही, भडंगवाडी, कुंभारवाडी, गढी, सुर्डी (बु.), डोईफोडवाडी, चोपड्याचीवाडी या राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या तर तळेवाडी, मन्यारवाडी, पांढरवाडी, टाकळगव्हाण, बाबुलतारा या पाच ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात गेल्या असून जव्हारवाडी, मुळुकवाडी, खर्डा, मानमोडी या ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात गेल्या आहेत. गंगावाडी, तलवाडा या ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे तर चव्हाणवाडी या ग्रामपंचायतीमध्ये जय हनुमान ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय झाला. या निवडणुकीमध्ये दोन मातब्बरांना जबरदस्त धक्का बसला. तलवाडा ग्रामपंचायत सुरेश हात्तेंच्या ताब्यातून गेली तर मादळमोही ग्रा.पं.वर २० वर्षांपासून निर्विवादीत वर्चस्व गाजवणारे बप्पासाहेब तळेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Exit mobile version