मुलगा म्हणून वावरणारा, कामाला जाणारा ‘तो’ प्रत्यक्षात ‘ती’ आहे याची जराशीदेखील शंका आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांना आली नाही. आपल्या शेजारी एक तरुण आणि एक तरुणी राहत असल्याचं सगळ्यांना वाटत होतं. पण प्रत्यक्षात त्या घरात दोन तरुणी राहत होत्या. अखेर एके दिवशी सत्य समोर आलं आणि सगळ्यांनाच धक्का बसला. उत्तर प्रदेशतल्या मिर्झापूरमध्ये हा प्रकार घडला आहे.
मिर्झापूरमध्ये समलैंगिक संबंधाची एक वेगळीच कहाणी समोर आली आहे. लखनऊमध्ये दोन तरुणींची घरं जवळजवळ होती. दोघींची मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघींनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र घरचे ऐकणार नाहीत, समाजाचा विरोध होणार, याची कल्पना असल्यानं दोघींनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघी मिर्झापूर जिल्ह्यातल्या अहरौरा परिसरात एक घर भाड्यानं घेऊन राहू लागल्या.
दोन तरुण मुली एक राहत असल्याचं कोणालाही कळू नये यासाठी एकीनं पुरुषांसारखे कपडे परिधान करण्यास सुरुवात केली. घर मिळाल्यानंतर घर चालवण्यासाठी नोकरी गरजेची होती. त्यामुळे तरुण बनलेली तरुणी एका प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरी करू लागली. तरुणी अगदी व्यवस्थितपणे पुरुषांसारखी चालत-बोलत-वागत असल्यानं कोणालाही शंका आली नाही. घरात राहणाऱ्या तरुणीनं नोकरीस जाणाऱ्या तरुणीची ओळख शेजारच्यांना आपला मित्र म्हणून करून दिली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी गायब होताच त्यांच्या कुटुंबियांनी याची माहिती पोलीस ठाण्यात दिली होती. पळून गेलेली एक तरुणी तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात होती. मात्र दुसऱ्या तरुणीला ही बाब खटकली. त्यावरून त्यांचं भांडण झालं. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि दोघींचं पितळ उघडं पडलं. आता पोलिसांनी दोन्ही तरुणींना त्यांच्या कुटुंबाकडे सोपवलं आहे. या प्रकरणाचा उलगडा होताच तरुणीच्या शेजारच्यांना मोठा धक्का बसला.