Site icon लोकाशा-बंब न्यूज

धनंजय मुंडेंना दिलासा ?:सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही- शरद पवार

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतल्याचे मत मांडले होते. परंतु, आज पवारांनी मुंडेंच्या बाजुने आपली प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळाली. प्रसार माध्यमांशी बातचीतदरम्यान, धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाल्याशिवाय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.

यावेळी शरद पवार म्हणाले की, ‘धनंजय मुंडेंच्या राजीनामाचा विचार करण्याची गरज आहे की नाही, यात मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्या महिलेबाबत अनेक गोष्टी पुढे आल्यामुळे, आधी त्याची सत्यता समोर आली पाहिजे. नाहीतर कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हा, अशी प्रथा पडू शकते. गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांचे, पोलिसांनी खोलात जाऊन तपास करावा. सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. सत्य बाहेर आल्यावर निर्णय घेता येईल. अशी स्पष्ट भूमिका पवारांनी मांडली.

‘आम्ही हस्तक्षेप करणार नाही’

पवार पुढे म्हणाले की, ‘भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसे नेते धुरी ही एक-दोन उदाहरण आली नसती तर वेगळा विचार केला असता, पण ही उदाहरणे आल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. वस्तुस्थिती समोर येईपर्यंत आम्हाला थांबावे लागेल. पोलिस विभाग चौकशी करेलच. पण, आमचे यात हस्तक्षेप करण्याचे काहीच कारण नाही. चौकशी करताना एखादी एसीपी लेव्हलची महिला अधिकारी त्यात असावी. मुंडेंसह इतरांचीही माहिती घेऊन वस्तुस्थिती पुढे आणावी. मी काल बोललो ते संपूर्ण नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार केल्यामुळे या प्रकरणाला गंभीर हा शब्द वापरला. आता सर्व चौकशी करावी आणि कुणावरही अन्याय होऊ नये असे वाटते”, असेही पवार म्हणाले.

Exit mobile version