मुंबई -ड्रग कंट्रोलर जनरलकडून आपत्कालिन वापरासाठी मंजुरी मिळाल्यानंतर येत्या 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले असल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. आज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लस दाखल होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना हे आरोप केले आहेत.
यावेळी राजेश टोपे म्हणाले की, महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या वतीने 9 लाख 63 हजार लसींचा डोस उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पण महाराष्ट्राला सतरा ते साडेसतरा लाख लसींच्या डोसची गरज आहे. आज त्यापैकी नऊ ते साडे नऊ लाख लसींचे डोस दाखल झाले आहेत. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार, ज्या व्यक्तीला तुम्ही डोस देत आहात, त्या व्यक्तिला पूर्ण दोन लसींचे डोस द्या. त्यामुळे राज्याच्या क्षमतेनुसार, आपल्याकडे 55 टक्के डोस आलेले आहेत.’
टोपे पुढे म्हणाले की, ’लसीकरणासाठी आठ लाख लोकांना अपलोड केले. त्याच्या तुलनेत लस थोडी कमी आली आहे. पण,जेवढी लस आली आहे ती लस आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये निश्चितपणे पोहोचेल. प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसीची साठवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आली आहेत. 16 जानेवारी रोजी सकाळी पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरात लसीकरणाचे उद्घाटन होईल. महाराष्ट्रातील कूपर रुग्णालय आणि दुसरे जालन्यातील जिल्हा रुग्णालय पंतप्रधानांशी यावेळी थेट संवाद साधू शकणार आहेत,’अशी माहिती टोपेंनी दिली.