Site icon लोकाशा-बंब न्यूज

राष्ट्रीय स्तरावरील राजकारणात महिलांचा टक्का वाढण्याची गरज,एमआयटीच्या ऑनलाईन राष्ट्रीय महिला संसदेत पंकजाताईंचे मत

पुणे, दि. 13 — “ राष्ट्रीय स्तरावर फक्त दोन टक्के महिला राजकारणात आहेत. एकीकडे जागतिक पातळीवरील राजकारणात कित्येक देशात महिलांना ५२ टक्के आरक्षण दिले गेले आहे. परंतू आपल्याकडे अजून या गोष्टीवर संपूर्णपणे विचार झालेला नाही, तो व्हायला हवा” असं मत भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे चार दिवसीय ऑनलाईन दुसर्‍या राष्ट्रीय महिला संसदेच्या तिसर्‍या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ‘राजकीय नेतृत्व-(महिला २.०, शक्ती, आवड आणि राजकारण)’ या विषयावर त्या बोलत होत्या. ही संसद १४ जानेवारी पर्यंत चालणार आहे.
या सत्रात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, माजी खासदार कु. मिनाक्षी नटराजन, डॉ. हर्षित पांडे, भारतीय जनता पक्षाच्या श्रीमती वनाथी श्रीनिवासन, कर्नाटकच्या महिला परिषदेच्या अध्यक्षा प्रमिला नायडू,
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड हे होते. या वेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू प्रा.डी.पी. आपटे, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील आणि सहयोगी संचालिका प्रा.डॉ. शैलश्री हरिदास हे उपस्थित होते.

पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, “ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा सांभाळल्यानंतर देशातील आर्थिक व संरक्षण विभागाच्या महत्वपूर्ण मंत्रीपदाचे सूत्र महिलांच्या हातात दिले आहे. तसेच ६ महिलांच्या खांद्यावर केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी दिली असून त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. या देशाचे लोकसभा अध्यक्षपद, मुख्यमंत्री, मंत्री अशा विविध पदांवरांची जवाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी सतत म्हणायचे की महिला कोणत्याही क्षेत्रात पुरूषांपेक्षा कमी नाहीत. जन्मापासून प्रत्येक गोष्टीसाठी लढणार्‍या महिलांनी कधीही कमजोर समजू नये. कारण जन्मानंतर पोषण, शिक्षण आणि त्यानंतर आपल्या पायावर उभे राहण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो. भविष्यात अनेक गोष्टींसाठी महिलांना सामना करावा लागणार आहे. त्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश करावा.”
“अधिकारासाठी लढणार्‍या महिला खूप आहेत पण ज्यांच्या हातात शक्ती आहे. अशा महिला खरच लढत आहेत का हा एक प्रश्नच आहे. त्यामुळेच आजच्या काळात महिलांनी राजकारणात सक्रीय सहभाग घ्यावा त्यासाठी आरक्षणाचा आधार घ्यावा लागला तरी चालेल असेही त्या म्हणाल्या.”
प्रा. डॉ. शैलश्री हरिदास यांनी स्वागतपर भाषण केले.
डॉ. प्रिती जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर रविंद्रनाथ पाटील यांनी आभार मानले.
••••

Exit mobile version