येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मध्यरात्री अचानक आग लागल्याने शिशू केअर युनिटमधधील दहा बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. सदरची आग ही शॉटसर्कीटने लागल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत असून या केअर सेंटरमधील सात बालकांचा जीव वाचवण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले आहे. नववर्षातील महाराष्ट्रातली सर्वात मोठी दुर्दैवी घटना म्हणून या घटनेकडे पाहितले जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत घोषीत केली आहे.
सगळे गाढ झोपेत असताना काळानं डाव साधला. ज्या घरांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट होणार होता. त्या कुटुंबाचं सुख काळाला पाहवलं गेलं नाही आणि त्याला सुस्थावलेल्या सरकारी व्यवस्थेचीही मदत झाली. शॉर्ट सर्किटचं निमित्त ठरलं आणि डोळे उघडून छाती भरून मोकळा श्वास घेण्याआधीच दहा कोवळ्या जिवांनी जगाचा निरोप घेतला. भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या या घटनेनंतर मातांच्या आक्रोशानं अंधार हेलावून गेला. आपल्या चिमुकल्यांसाठी टाहो फोडणार्या मातांना बघून सगळ्यांचे डोळे भरून आले.
शनिवारची सकाळ महाराष्ट्राला ह्रदयाला पाझर फोडणारी बातमी घेऊन आली. भंडारातील जिल्हा रुग्णालयात झोपेच्या डुलक्या घेणार्या कोवळ्या जिवांना काळानं कवेत घेतलं. अतिदक्षता शिशु केअर युनिटमध्ये १७ चिमुकल्यांपैकी दहा जणांना काळानं हिरावून घेतलं. सात चिमुकल्यांचा श्वास न घेता आल्यानं गुदमरुन मृत्यू झाला. तर तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. कोमळ हळव्या शरीराचे झालेले ऐकून चिमुकल्यांच्या मातांचं अवसानच गळालं. क्षणभर काहीच कळालं नाही. लेकरू कायमच गेलं, हे ध्यानात येताच रुग्णालयाला हेलावून टाकणारा आक्रोश मातांच्या मुखातून बाहेर पडला. चिल्यापिल्यांसाठीचा हा आक्रोश ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले नाही. तर रुग्णालयाच्या भिंतीही शहारल्या. प्रशासन सात मुलांना वाचवल्याचं सांगत असलं, तरी दहा कुटुंब मात्र शोकात बुडाली आहे. रुग्णालयाकडून शॉर्ट सर्किटचं निमित्त सांगितलं जात आहे. त्याचबरोबर सरकारकडून नुकसान भरपाई देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. मात्र, इवल्याशा पावलांनी घरात येऊ पाहणारं सुख सरकारी अनास्थेनं हिरावून घेतलं, ते या पैशातून मिळणार आहे का? असा सवाल दुःखाच्या सागरात बुडालेली ही कुटुंब करत आहेत.