Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ड्राय रण यशस्वी, बीड वडवणी, परळीतील प्रत्येकी 25 आरोग्य कर्मचार्‍यांनी घेतला सहभाग, सीईओ अजित कुंभार यांच्या हस्ते लसीकरण कक्षाचा शुभारंभ

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ड्राय रण यशस्वी, बीड वडवणी, परळीत 75 आरोग्य कर्मचार्‍यांचा सहभाग,
सीईओ अजित कुंभार यांच्या हस्ते लसीकरण कक्षाचा शुभारंभ

बीड,

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आज शुक्रवारी (दि.8) राज्यातील 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातही आज सकाळी तीन ठिकाणी कोरोना लसीकरणाचा ड्राय रन यशस्वी करण्यात आला. बीड जिल्हा रुग्णालयात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते कोरोना लसीकरण कक्षाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली. दरम्यान वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच परळी उपजिल्हा रुग्णालयातही ड्राय रन यशस्वी झाला. आता लवकरच लसीकरणासाठीचे नियोजन पुर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गत 2020 हे वर्ष कोरोनाशी लढा देण्यात गेले. आता कोरोनावर मात करण्यासाठी लस शोधण्यात यश आले आहे. दरम्यान येत्या काही दिवसातच लसीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात आज शुक्रवारी कोरोना लसीकरणासाठी 30 जिल्ह्यात ड्राय रन राबवण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच परळी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी प्रत्येकी 25 या प्रमाणे 75 आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस देण्याची रंगीत तालीम करण्यात आली. तत्पूर्वी शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता जिल्हा रुग्णालयात सीईओ अजित कुंभार यांच्या हस्ते लसीकरण कक्षाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट, नोडल ऑफिसर डॉ.संजय कदम, डॉ.बाबासाहेब ढाकणे, डॉ.सुधीर राऊत, मेट्रन संगीता दिंडकर, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सुवर्णा बेद्रे यांची उपस्थिती होती.

असा झाला ड्राय रन

या ड्राय रनमध्ये जिल्हा रुग्णालय, वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्र व परळी उपजिल्हा रुग्णालयात चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर 25 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. तत्पूर्वी लाभार्थ्यांना त्यांच्या कोवीन अ‍ॅपवरील नोंदणी नुसार कक्षात सोडण्यात आले. त्यानंतर कोवीन अ‍ॅप्लीकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोवीन अ‍ॅपमध्ये करण्यात आली. यावेळी हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझरची उपलब्धता करण्यात आली होती.

यासाठी घेतला ड्राय रन

क्षेत्रिय स्तरावर कोवीन अ‍ॅप किती सोईस्कर व उपयोगी आहे हे तपासणे. कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी-तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सुचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी शुक्रवारी हा ड्रायरन घेण्यात आला.

जिल्ह्यांचे यूजर आयडी तयार

या ड्राय रनच्या माध्यमातून राज्यस्तरावरुन जिल्हयांचे यूजर आयडी तयार केले जात आहेत. जिल्हास्तरावरुन आरोग्य संस्थेचे व लसीकरण पथकाचे यूजर आयडी तयार करण्याचे काम झाले. जिल्हयांनी चाचणी लाभार्थ्यांची निवड करून कोविन अ‍ॅपमध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपींग करणे, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोवीन पोर्टलवर अपलोड करणे, लाभार्थी व आरोग्य सेविकेचे सत्र स्थळ निश्चित करणे, लस वाटप करणे व शितसाखळी केंद्राला कळविणे, आरोग्य सेविकेला सत्राचा दिवस व वेळ कळविणे, लसीकरण अधिकारी 1 ते 4 आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांना त्याची माहिती देणे आदी पूर्वतयारी करण्यात आली. यासंदर्भात नुकतेच व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणही देण्यात आले होते.

Exit mobile version