अंबाजोगाई, दि. 7 (लोकाशा न्यूज) : सासूला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जावायास दहा वर्षाच्या सक्त कारावासाची शिक्षा अंबाजोगाई येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एम.बी.पट्टवारी यांनी सुनावली आहे, या शिक्षेबरोबरच सदर आरोपीस पंधरा हजार रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
गुरूवारी अंबाजोगाई येथील अतिरीक्त सत्र न्यायालय श्रीमती एम.बी.पट्टवारी यांनी फिर्यादी नामे सौ.शिवशाला भ्र.शेषेराव इंगळे (रा.दादाहरी वडगाव ता.परळी जि.बीड) यांच्यावर आरोपी नामे तानाजी विठ्ठल भोसले याने शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्ष सक्त कारावास व 15,000 / – रूपये दंडाची शिक्षा सुनवाली आहे. याबाबत माहिती अशी, की फिर्यादी नामे सौ.शिवशाला भ्र.शेषेराव इंगळे (रा.दादाहरी वडगाव ता.परळी जि.बीड) यांची मुलगी नामे सुनिता हिचे लग्न सुमारे दहा वर्षापुर्वी बोरखेड ता.सेनगाव येथील आरोपीनामे तानाजी विठ्ठल भोसले याच्यासोबत रितीरिवाजाप्रमाणे झाले होते. आरोपी हा गेल्या चार वर्षापासून अमरावती जिल्ह्यात दरोडा टाकल्याप्रकरणी जेलमध्ये शिक्षा भोगत असून तो दिड महिन्याकरीता रजेवर आला होता, दरम्यान त्याने पत्नीनामे सुनिता हिच्या चारित्र्यावर संशय घेवून तिस मारहाण करून तिस फिर्यादीच्या घरी माहेरी पाठवून दिले होते. दि. 3 मे 2015 रोजी फिर्यादी यशराज हॉटेल ( धाबा ) येथे स्वयंपाक कामासाठी गेली होती. सुनिता घरी एकटीच होती. रात्रीच्या अंदाजे साडे अकरा बारा वाजण्याचे सुमारास सुनिताचा पती तान्हाजी व त्याचे सोबत एक अनोळखी इसम घरी येवून तिच्या सोबत भांडण करून तिला चापटाने मारहाण करून नांदवयास का येत नाही असे म्हणत तुझी आई कोठे आहे असे विचारून घरातून निघून गेले आहेत असे सुनिताने फोनद्वारे सांगितले. दरम्यान आरोपी तान्हाजी व त्याचा सोबती मोटारसायकलवरून यशराज हॉटेल ( धाबा ) येथे आले व त्यांनी पत्नीला नांदवयास का पाठवत नाहीस असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ करून तिस जिवे मारण्याची धमकी देवून त्याच्याजवळ असणारे पिस्तुलमधून फिर्यादीच्या दिशेला गोळी झाडली, फिर्यादी बाजूला सरकल्याने गोळी जमीनीवर लागली. गोळीचा आवाज ऐकून धाब्यावरील इतर लोक जमा झाल्याने आरोपी तान्हाजी व त्याचा साथीदार मोटारसायकलवरून पसार झाले. सबब फिर्यादीने पोलीस ठाणे परळी ग्रामीण येथे गु.र.नं .52 / 2015 कलम 307,323,504,506,34 भादवि अन्वये आरोपीनामे तान्हाजी विठ्ठल भोसले याच्याविरूध्द फिर्याद नोंदविली. प्रकरणांचा तपास तत्कालीन सहा.पोलीस निरीक्षक व्ही.एस.पल्लेवाड यांच्याकडे वर्ग करण्यात आला. तपासीक अधिकारी यांनी आरोपीताविरूध्द सबळ पुरावा गोळा करून मुदतीत दोषारोप पत्र न्यायालयास सादर केले. प्रकरणांची सुनावणी अतिरीक्त सत्र न्यायालय श्रीमती एम.बी.पट्टवारी यांच्या न्यायालयात होऊन गुरूवारी अंतीम न्यायनिर्णय पारीत करण्यात आला. न्यायालयाने आरोपीतास कलम 307 भादंवि अंतर्गत दोषी धरून 10 वर्ष व 15,000 / – रु दंड, दंड न भरल्यास दोन महिने अतिरीक्त सश्रम कारावास, कलम 323 भादवि मध्ये 1 वर्ष सक्त कारावास व 1000 / – रू दंड , दंड न भरल्यास 1 महिना अतिरीक्त कारावास, कलम 506 भादंवि मध्ये 7 वर्ष सक्त कारावास व 5000 / – रूपये दंड , दंड न भरल्यास 2 महिने अतिरीक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील ए.व्ही.कुलकर्णी यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज पोह / 1070 जी.पी.कदम यांनी पाहिले.
—