Site icon लोकाशा-बंब न्यूज

परळी औद्योगिक वसाहतीमधील कुलरच्या कारखान्याला भिषण आग ; लाखोंचे नुकसान

परळी वैजनाथ दि २३ ( लोकाशा न्युज ) :-परळी येथील औद्योगिक वसाहतीमधील साई कुलरच्या कारखान्यास अचानक भीषण आग लागल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत लाखोंचे विविध प्रकारचे साहित्य जळून खाक झाले असुन सुदैवाने जिवित हानी किंवा कोणीही जखमी झाले नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली आणि किती नुकसान झाले याबाबतची वास्तविक माहिती अद्याप हाती आली नसून जवळपास दोन तास अग्निशमन बंब आग आटोक्यात आणण्याचा शर्थीने प्रयत्न करत होते.याबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी शहरातील औद्योगिक वसाहतीमध्दे सुनिल सोळंके यांचे साई कुलर नावाने नवीन कुलर उत्पादन करण्याचा कारखाना आहे. त्याचबरोबर सदर कारखान्यांमध्ये नवीन उत्पादन करण्याचे साहित्य आणि इलेक्ट्रॉनीक साहित्य साठवणूक करण्याचे गोदाम आहे. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास का व कुणास ठाऊक सदरील कुलरच्या कारखान्यास आणि कारखान्यामध्येच असलेल्या विविध साहित्याच्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागली. आग लागताच कारखान्यामध्ये उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता आगीने रौद्ररूप धारण केले आणि धुराचे लोट परिसरात पसरले. त्याचबरोबर धुराचे लोट उंच पसरू लागल्याने शहरात दूरवर नागरिकांना दिसत होते. धुराचे लोट दिसताच नागरिक आगीच्या घटनास्थळाच्या दिशेने मदत करण्यासाठी धावत होते. आगीने रौद्ररूप धारण करतात परळी नगरपरिषद आणि औष्णिक विद्युत केंद्राच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. दोन्ही अग्नीशमन बंबाने जवळपास दोन ते अडीच तास प्रयत्नांची पराकाष्टा करून आग आटोक्यात आणली. या आगीत कुलर व इतर साहित्य जळुन खाक झाली असुन लाखोचे नुकसान झाले आहे. सदरची आग नेमकी कशामुळे लागली ? कोणते साहित्य जळाले आणि किती नुकसान झाले ? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती हाती आलेली नाही. आगी बाबत मात्र परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

Exit mobile version