अंबाजोगाई : अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या विशेष पथकाने परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील पत्त्यांच्या दोन क्लबवर छापा मारला. या कारवाईत परळी येथून तब्बल ७ लाख १८ हजार ५०० रुपयांचा तर अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथून ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी एका अल्पवयीन युवकासह १६ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.
‘
परळीतील शिवारातील एका वीटभट्टीच्या बाजूला असलेल्या ओढ्यालगतच्या मोकळ्या पटांगणात काही जुगारी झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळ असल्याची माहिती गुरुवारी (दि.३) सायंकाळी डीवायएसपी सुनील जायभाये यांच्या पथकास मिळाली होती. त्याआधारे पथकाने सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सदरील ठिकाणी छापा मारला असता तिथे अंकुश सुभाष सूर्यवंशी (रा. सिद्धेश्वर नगर, परळी), बालाजी बळीराम जाधव (रा. वडसावित्री नगर, परळी), जफर खान अल्ताफ खान ((रा.बरकतनगर, परळी), शिवाजी बाबुराव जाधव (रा.नांदुरवेस गल्ली, परळी), विष्णू बाबुराव भोसले (रा. वडसावित्री नगर, परळी) आणि शिवराज महादेव चिखले (रा.नांदुरवेस गल्ली, परळी) यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दुचाकी, मोबाईल, दारू, रोख रक्कम असा एकूण ७ लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पो.ना. पुरुषोत्तम सुदामराव मिसाळ यांच्या फिर्यादीवरून सात जुगाऱ्यांसह अनोळखी क्लब चालकावर परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
दुसरी कारवाई अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे करण्यात आली. घाटनांदूर येथे काही जुगारी तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याच्या गुप्त माहितीवरून डीवायएसपींच्या पथकाने शनिवारी (दि.५) सायंकाळी साडेपाच वाजता बालाजी टी हाउसच्या पाठीमागील मोकळ्या जागेत पटांगणात सुरु असलेल्या पत्त्याच्या क्लबवर छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी पत्ते खेळणाऱ्या नारायण तुकाराम जाधव, संतोष दिगांबर आरसुडे, बापूराव नामदेव जाधव, रोहित हरिश्चंद्र आरसुडे, शेख नूर शेख चांद, बिभीषण नामदेव माने, सिद्धराम राजाराम जाधव, सिद्धराम राजाराम जाधव (सर रा. घाटनांदूर) आणि शाम राजाराम जाधव (रा. चोथेवाडी) या ९ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले तर शेख मुजीब हा पळून गेला. यावेळी घटनास्थळाहून मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ४० हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पो.ह. संजय श्रीमंतराव गुंड यांच्या फिर्यादीवरून सर्व दहा जुगाऱ्यांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार शफिक, पो.ह. संजय गुंड, पो.ना. बिक्कड, पो.काॅ. राजकुमार मुंडे, अशोक खेलबुडे, सतीश कांगणे, आतकरे, कागणे यांनी पार पाडली.