मुंबई, दि.४ (लोकाशा न्यूज) : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी समितीद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. पुढील काही महिने अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्त्वाचे असल्याचं दास म्हणाले. तसंच पुढील तिमाहित जीडीपी वाढीचा दर सकारात्मक राहण्याची शक्यताही यावेळी वर्तवण्यात आली. दरम्यान, यावेळीही रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. २ डिसेंबर पासून रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीच्या बैठकीला सुरूवात झाली होती.
“रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. रेपो दर हे चार टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे. बैठकीत सर्व सदस्यांच्या संमतीनं हा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती दास यांनी यावेळी दिली. तर दुसरीकडे रिव्हर्स रेपो दरही ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. बँक रेटमध्येदेखील कोणतेही बदल करण्याचा निर्णय झाला नाही. ते ४.२५ टक्क्यांवर आणि कॅश रिझर्व्ह रेशो तीन टक्क्यांवर कायम असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान, पुढील काळात महागाई दर नियंत्रणात येईल अशी शक्यताही वर्तवण्यात आली.