Site icon लोकाशा-बंब न्यूज

बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा – पंकजाताई मुंडे यांचे राज्य सरकारला पत्र

बीड दि. २५ —— राज्यात विविध ठिकाणी बिबटयांचे हल्ले वाढले असून अनेकांचा बळी गेला आहे. बिबटयांना रोखण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्य सरकारकडे एका पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, आष्टी येथे बिबटयाच्या हल्ल्यात बळी पडलेल्या नागनाथ गर्जे यांच्या मृत्यूबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आहे.

पाथर्डी (अहमदनगर), पैठण (औरंगाबाद), आष्टी (बीड) तसेच सिन्नर (नाशिक) परिसरात नरभक्षक बिबटयांचा मोठया प्रमाणात वावर असून नरभक्षक बिबटयाच्या हल्ल्यात अनेक बालके व व्यक्ती मृत्युमुखी पडल्याने मोठया प्रमाणावर मनुष्य हानी झालेली आहे. बिबटयाच्या हल्ल्यात महिला व बालके गंभीर जखमी झालेले आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या गायी, शेळया या पाळीव प्राण्यांचा मृत्यु झालेला आहे. सदरच्या घटना हया सुन्न करणाऱ्या आहेत. भगवानगड, तिनखडी, शिरसाटवाडी ता. पाथर्डी (अहमदनगर) येथे तसेच सुर्डी, ता. आष्टी (बीड), चांदबीबी ता.जि.(अहमदनगर), अहमदनगर, पाथर्डी व आष्टी तालुक्याला लागून असलेल्या गर्भगिरी डोंगरपट्टयात बिबटयाचा वावर असल्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे व दहशतीचे वातावरण आहे. राज्यातील विविध भागातील नामांकित नेमबाजांना पाचारण करुन ठिकठिकाणी मोठया प्रमाणावर पिंजरे लावून बिबटयाला जेरबंद करण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे.

नरभक्षक बिबटयाच्या हल्ल्यात श्रेया साळवे, मढी (आमदरा), सक्षम आठरे, केळवंडी, सार्थक बुधवंत, शिरापूर, सर्व ता. पाथर्डी, जि. अहमदनगर, सुभद्राबाई म्हस्के, जामखेड, ता. अंबड, जि जालना, कृष्णा आवटे, अशोक आवटे, आपेगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद, नागनाथ गर्जे, सुर्डी, ता. आष्टी, जि. बीड यांचे मृत्यु झाले आहेत, त्यामुळे त्यांच्या वारसांना तसेच जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ शासना मार्फत अर्थसहाय्य करावे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व वनमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
••••

Exit mobile version