कडा, दि. 20 (लोकाशा न्यूज) : केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ शिक्षक, डॅक्टर, नोकरदार, सेवानिवृत्त अधिकारी, राजकीय पदाधिकारी, व्यापारी, आयकर दात्यांनीही उचलल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
आष्टी तालुक्यात एकूण दोन हजार 50 लाभार्थी अपात्र असल्याचे पडताळणीमध्ये समोर आले असून या लाभार्थींना वाटप करण्यात आलेली एक कोटी 70 लाख 68 हजार रुपयांची रक्कम शासनाकडे जमा करावी लागणार आहे. सतत नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत असलेल्या शेतकरी वर्गाला निश्चित उत्पन्न प्राप्त होण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या अल्प व अत्यल्प शेतकरी कुटुंबांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. तालुक्यातील 51 हजार 952 शेतकर्यांनी या योजनेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. दोन हेक्टरपर्यंत जमिनीचे क्षेत्र असणारे अल्प, अत्यल्प शेतकरी कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतात. परंतु, शेतकरी असूनही शिक्षक, डॅक्टर, नोकरदार, सेवानिवृत्त अधिकारी, राजकीय पदाधिकारी, व्यापारी असणारे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरतात. या लाभार्थींची पडताळणी आयकर विभाग व प्रशासनाने केल्यानंतर लाभ घेणार्या शेतकर्यांपैकी दोन हजार 50 लाभार्थी अपात्र असल्याचे पुढे आले आहे. या लाभार्थींना त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले एक कोटी 70 लाख 68 हजार रुपये शासनाकडे जमा करावे लागणार आहेत.
संबंधितांना तलाठ्यांमार्फत नोटिसा
संबंधितांकडून रकमेच्या वसूलीसाठी तलाठ्यांमार्फत नोटिस पाठविण्यात आलेल्या आहेत. आतापर्यत एक हजार सातशे पन्नास शेतक-यांकडून दोन लाख बारा हजार रुपये वसूली करण्यात आली आहे. अपात्र लाभार्थींनी त्यांच्याकडे असलेली वसूलीपात्र रक्कम तहसील कार्यालय किंवा नेमण्यात आलेल्या वसूली पथकाकडे जमा करावी, असे आवाहन नायब तहसिलदार निलीमा थेऊरकर यांनी केले आहे.