Site icon लोकाशा-बंब न्यूज

आष्टी तालुक्यातील दोन हॉटेलवर एलसीबीची धाड



बीड, दि. 20 (लोकाशा न्यूज) : पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्या आदेशाने जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे. 19 नोव्हेंबर रोजी अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन हॉटेलवर धाड टाकून गुन्हे शाखेच्या पथकाने दारूचा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. याबरोबरच अवैधपणे दारू विक्री करणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवून कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांच्या अधिपत्याखाली वेगवेगळे पथके तयार केलेले आहेत. सदर पथकातील पोलिस अधीकारी व कर्मचारी 19 नोव्हेंबर रोजी अंभोरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बीड ते अहमदनगर रोडवर उदंरखेल शिवारात हॉटेल गारवा येथे इसम दत्तू महादेव वनवे व हॉटेल साहेबा येथे इसम महेश अशोक सिरसट हे देशी विदेशी दारूची चोरट्या पध्दतीने विक्री करत आहेत. या माहितीच्या आधारे सापळा रचून पथकाने हॉटले साहेबा येथे छापा मारला. यावेळी देशी-विदेशी दारू कि.48138 रूपयांचा माल व हॉटेल गारवा येथे देशी-विदेशी दारू 2,240 रूपयांचा असा एकूण 50,378 रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. दत्तू महादेव वनवे (वय 50 रा.कारखेल ता.आष्टी) आणि महेश अशोक सिरसट (वय 23 रा.आरणविहरा ता.आष्टी) यांच्याविरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.

Exit mobile version