बीड, दि. 20 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांना ठराविक कालावधीसाठी मुंबई येथे बेस्ट बसची वाहतूक सेवा करण्यासाठी टप्प्याटप्प्याने पाठवण्यात येत असल्याची माहिती समजताच खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहून जिल्ह्यातील एस.टी कर्मचार्यांना बेस्ट बसच्या वाहतूक सेवेतून सूट द्यावी आणि मुंबईत बेस्टमध्ये कर्तव्य बजावण्यास मनाई करावी अशी मागणी केली आहे.
जिल्ह्यातील एस.टी कर्मचार्यांना ठराविक कालावधीसाठी बेस्टच्या वाहतूक सेवेचे कर्तव्य दिल्यामुळे एस.टी कर्मचार्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.यासंदर्भात खा.प्रितमताई मुंडे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहून कर्मचार्यांच्या अडचणी मांडल्या आहेत.बीड जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या चारशे कर्मचार्यांना आतापर्यंत मुंबईला बेस्टमध्ये वाहतूक सेवेसाठी पाठवण्यात आले होते.यापैकी 146 कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे.कोरोनाची लागण झालेल्या एस.टी कर्मचार्यांना शासन स्तरावर औषधोपचार,आर्थिक सहाय्य व इतर शासकीय सुविधा त्वरित पुरविण्यात याव्यात अशी देखील मागणी खा.प्रितमताई मुंडे यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. तसेच मुंबईला बेस्टच्या वाहतुकीसाठी पाठविण्यात आलेल्या कर्मचार्यांना पगारी रजा ग्राह्य करण्यात यावी आणि एस.टी च्या कर्मचार्यांना मुंबईत कर्तव्य बजावण्यास मनाई करून कोरोनाची लागण झालेल्या कर्मचार्यांना परत मुंबईला कर्तव्य मनाई करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान जिल्ह्यातील एस.टी कर्मचार्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडल्याबद्दल एस.टी कर्मचार्यांमधून खा.प्रितमताई मुंडे यांचे आभार मानले जात आहेत.
बीड जिल्ह्यातील एस.टी कर्मचार्यांना बेस्ट वाहतूक सेवेतून सूट द्या, खा. प्रितमताईंची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
