Site icon लोकाशा-बंब न्यूज

कौटूंबिक वादातून ‘त्या’ तरूणाची हत्या, अवघ्या काही तासांमध्येच पो.नि. शरद भुतेकरांनी प्रकरणाचा लावला छडा



बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : नागापूर (बु.) येथील 23 वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला. शुक्रवारी सकाळी हा मृतदेह पिंप्री फाटा परिसरामध्ये काही लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर याची माहिती पिंपळनेर पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार ठाण्याचे प्रमुख शरद भुतेकरांसह त्यांच्या टिमने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मयताच्या पोटावर, हातावर गंभीर वार करण्यात आलेले आहेत. सदर घटना कौटूंबिक वादातून घडली असून अवघ्या काही तासातच या घटनेचा पिंपळनेर ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद भुतेकरांनी छडा लावला आहे.
  राजाभाऊ अशोक खराडे (वय 23, रा. नागापूर बु.) असे हत्या झालेल्या तरूणाचे तर महारूद्र मच्छिंद्र परसकर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजाभाऊ खराडे आणि आरोपी महारूद्र परसकर हे दोघे जण नातेवाईक आहेत. मयताची मावस बहीण आरोपीच्या भावाला दिलेली आहे. आरोपीचा भाऊ मयताच्या मावस बहीणाला व्यवस्थित नांदवत नव्हता, यामुळे सातत्याने कौटूंबिक वाद होत होते, याच वादातून गुरूवारी रात्री राजाभाऊ खराडे या तरूणाचे आरोपीने अपहरण केले होते, याबाबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हाही नोंद करण्यात आलेला आहे. तर हा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी त्या तरूणाचा शोध घेण्यास सुरूवात केली, मात्र शुक्रवारी सकाळी त्या तरूणाचा मृतदेह बीडपासून काही अंतरावर असलेल्या पिंप्री फाटा येथील एका रस्त्याच्या कडेला आढळून आला. धारदार शस्त्राने त्या तरूणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपळनेर ठाण्याचे प्रमुख शरद भुतेकर, शेख, सावंत, जोशी, तेलप, सुरवसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्याचप्रमाणे डीवायएसपी संतोष वाळके यांनीही घटनास्थळी जावून पाहणी केली आहे. याबाबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात सदर आरोपीवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अवघ्या काही तासातच पोलिस निरीक्षक शरद भुतेकरांनी सदर घटनेचा तपास लावला आहे.

Exit mobile version