मुंबई, दि. ५ (लोकाशा न्यूज) : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या कारवाईची तुलना भाजपाकडून १९७५च्या आणीबाणी केली जात आहे. त्यातच आता भाजपाचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी चक्क दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर राज्यात आणीबाणी २.० चा लागल्याचा दावा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं पोस्टर लावलं आहे.वास्तुविषारद असलेले अन्वय नाईक यांनी अलिबाग येथे आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (५ नोव्हेंबर) ताब्यात घेण्यात आलं. रायगड पोलिसांनी केलेल्या या अटकेवरून भाजपाकडून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपा नेत्यांनी या घटनेची तुलना आणीबाणीशी केली.महाराष्ट्र भाजपाकडून राज्य सरकारला लक्ष्य केलं जात असतानाच दिल्लीतील भाजपाचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी थेट महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टर लावत महाराष्ट्रात आणीबाणी २.० लागल्याचा दावा केला. महाराष्ट्र सदनाबाहेर लावण्यात आलेल्या या पोस्टरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे फोटो आहेत. ‘आणीबाणी २.०मध्ये आपलं स्वागत आहे,’ असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात आणीबाणी २.०; भाजपा नेत्यानं महाराष्ट्र सदनाबाहेर लावलं उद्धव ठाकरे-इंदिरा गांधींचं पोस्टर
