बीड, दि. 2 (प्रतिनिधी):- संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, इंदिरा गांधी योजनेतील लाभार्थ्यांचे गेल्या पाच महिन्यापासून अनुदान थकलेले होते. याबाबत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सूचना केल्यानंतर सदर योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात 7 कोटी पेक्षा अधिक अनुदान रक्कम वर्ग करण्यात आली आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या या प्रयत्नाने निराधारांची दिवाळी गोड होणार आहे. संजय गांधी योजनेतील 2 कोटी 48 लाख , श्रावणबाळ योजनेतील 1 कोटी 93 लाख, इंदिरा गांधी योजनेतील 2 कोटी 82 लाख अनुदान रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या सूचनेनंतर वर्ग करण्यात आली असून प्रलंबित प्रकरणेही लवकरच निकाली काढण्यात येतील अशी माहिती देत निराधारांना काही अडचणी असल्यास थेट संपर्क करावा असे आवाहनही ग्रामीणचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर, शहरचे अध्यक्ष अशफाक इनामदार यांनी केले आहे. बीड तालुक्यातील संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे, निराधारांचे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून अनुदान रखडलेले होते. याबाबत निराधारांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्यानंतर सदरील अनुदान तातडीने निराधारांच्या खात्यात वर्ग करण्यात यावे यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सूचना करत सदरील प्रश्न मार्गी लावून घेतला आहे. बीड शहरातील व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना दिवाळी सण तोंडावर आलेला असतांना अनुदान रक्कम तातडीने मिळावी अशा सूचनाही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केल्या आहेत. सदर अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी तहसीलदार सुशांत शिंदे, नायब तहसीलदार अभय जोशी, नायबत तहसीलदार श्रीमती कुटे व इतर कर्मचार्यांनी प्रयत्न केले असून पालकमंत्री धनंजय मुंडे, आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली निराधारांचे समितीअंतर्गत लाभार्थ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असल्याचे समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर, अशफाक इनामदार यांनी म्हटले आहे