Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्हाधिकाऱ्यांच्या दणका, टाक यांच्या गौरी हॉस्पिटलचा परवाना रद्द, जिल्हा शल्यचिकित्सकांनी काढले आदेश



बीड दि.28 ऑक्टो: कॅनॉल रोडवर असलेल्या श्रीमती वृषाली बाळासाहेब टाक यांच्या मालकीच्या गौरी हॉस्पिटलचा रूग्णालयाचा परवाना बीडचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये रद्द करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक, यांनी काढले आहेत.
यासंदर्भात माहिती अशी की, बीड जिल्हा रूग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर बाळासाहेब टाक यांना कोणत्याही खाजगी रूग्णालयात काम न करण्याचे आदेश निगर्मित केले होते. त्यानुसार श्रीमती वृषाली बाळासाहेब टाक यांच्या रूग्णालयाचे डॉ.बाळासाहेब टाक हे भीषक म्हणून रूग्णांना सेवा देतात. डॉ. टाक यांना कोणत्याही खाजगी रूग्णालयात सेवा न देण्याचे आदेश असल्यामुळे मुंबई नर्सिग होम रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट 1949 अन्वये असणारा परवाना दिनांक 23 ऑक्टोबर 2020 च्या आदेशान्वये रद्द करण्यात आला आहे.
सदर कारवाईमुळे रूग्णालयास बॉम्बे नर्सिग होम अ‍ॅक्ट नुसार देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र निलंबनाचे आदेश प्राप्त होताच या कार्यालयास जमा करण्याचे आदेश बीड जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी निर्गमित केले आहेत.
दरम्यान विविध तक्रारीमुळे डॉ.बाळासाहेब टाक यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांनी गेल्या आठवडयात निलंबित केले आहे. डॉ.बाळासाहेब टाक यांना विविध आरोपाखाली निलंबित करण्यात आले तर त्यांच्या रूग्णालयाचाही परवानाही निलंबित करण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version