दिल्ली, दि. 22 (लोकाशा न्यूज) : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. इतर अनेक आश्वासनांपैकी यंदा भाजपाने करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोनाचा मोफत लस देण्यात येईल असं आश्वासनही आपल्या जाहीरमान्यात दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज साडे दहाच्या सुमारास बिहार निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
बिहार निवडणुकीसाठी भाजपाने ११ संकल्प असणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अगदी करोनाच्या लसीपासून ते रोजगार आणि अल्पबचत गटांपर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. आयसीएमआरने परवानगी दिल्यानंतर बिहारमधील सर्व व्यक्तींना करोनाचा लस मोफत दिली जाईल असं जाहीरमान्यात म्हटलं आहे. बिहारमधील प्रत्येक नागरिकाला येथील राजकीय परिस्थितीचा योग्य अंदाज आहे. पक्षाने दिलेल्या आश्वासनांबद्दल त्यांना योग्य माहिती आहे. कोणी आमच्या जाहीरनाम्यासंदर्भात प्रश्न विचारल्यास आम्ही त्याला योग्य उत्तर नक्कीच देऊ शकतो. आम्ही जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने योग्य पद्धतीने पूर्ण केल्याचं आत्मविश्वासाने सांगू शकतो, असं सीतारामान यांनी यावेळी म्हटलं आहे.