बीड, दि. 22 ऑक्टोबर : दरवर्षी भगवान बाबांच्या जन्मस्थानी होणारा दसरा मेळावा यंदाही साजरा करण्याचे आवाहन लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे लोकांच्या जिवाची काळजी घेऊन यंदाचा मेळाव्याला पंकजाताई भगवान भक्ती गडावरून ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. भक्तांनी गडावर न येता घरी थांबूनच भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक व्हावे, आतापर्यंत आपण गडावर गर्दीच्या संख्येचा विक्रम रचला यावर्षी कार्यक्रमांच्या संख्येचा विक्रम रचूयात, असे आवाहन पंकजाताईंनी केले आहे.
भगवान बाबा आणि मुंडे भक्तांसाठी पंकजाताईंनी गुरूवारी सकाळी एक व्हिडिओ जारी केला आहे, भक्ती आणि शक्तीची परंपरा टिकून रहावी यासाठी मुंडे साहेबांनी दसरा मेळाव्याची परंपरा अखंडपणे चालू ठेवली आपल्याही ती अशी अविरतपणे सुरू ठेवायची आहे. या वर्षी कोरोणाच्या महामारीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत, दसर्याला भगवान भक्ती गडावर गर्दी झाली तर भक्तांचे आरोग्य धोक्यात येवू शकते, भक्तांचे आरोग्य धोक्यात येईल असे काम ही तुमची लेक कधीच करणार नाही, त्यामुळे यावेळी सर्वांनी भगवान भक्तीगडावर येण्याऐवजी आपापल्या गावात भगवान बाबांच्या प्रतिमेचे सार्वजनिक पूजन करावे, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे, दरवर्षी गडावरील गर्दीच्या संख्येचा विक्रम होतो यावर्षी कार्यक्रमाच्या संख्येचा विक्रम आपण करूयात. मी भगवान भक्तीगडावरून तुम्हाला याही वर्षी मार्गदर्शन करणार आहे पण ते ऑनलाईन असणार आहे, असे पंकजाताई यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यंदाचा मेळाव्याला खंड पडणार नाही आणि आपली भक्ती आणि शक्तीची परंपरा देखील कायम राहील असे, पंकजाताई म्हणाल्या आहे. पंकजाताईंच्या या आवाहनामुळे भगवान बाबा आणि मुंडे भक्तांमध्ये प्रचंड उर्जा निर्माण झाली आहे.