Site icon लोकाशा-बंब न्यूज

..तर तात्काळ नुकसान भरपाई देवून शेतकर्‍यांची दिवाळी गोड करावी, पंकजाताईंची राज्य सरकारकडे मागणी


नांदेड, दि. 20 ऑक्टोबर : मराठवाडयात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला असून त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहण्याची आज खरी गरज आहे, त्यासाठी सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना विनाविलंब भेदभाव न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी. ’दसरा गेला, आता त्यांची ’दिवाळी तरी गोड करा’ अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्य सरकारकडे आग्रही मागणी केली.
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना धीर देण्यासाठी पंकजाताई मुंडे हया मराठवाडयाचा दौरा करत असून आज त्यांनी नांदेड जिल्हयातील धनगरवाडी ता. नांदेड, कारेगाव, पारडी ता. लोहा येथे बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. रस्त्यावर पाहणी न करता त्यांनी थेट शेतापर्यंत जाऊन संकटात सापडलेल्या बळीराजाशी संवाद साधत त्यांना धीर दिला. शेतकर्‍यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, शेतकरी सध्या आसमानी व सुलतानी अशा दोन्ही संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्याची व मदत करण्याची खरी गरज आहे. शेतकरी उपाशी राहू नये याची खबरदारी सरकारने घ्यावी तसेच पंचनामे करताना भेदभाव झाला नाही पाहिजे. शेतकर्‍यांच्या पिकांना विनाविलंब सरसकट नुकसान भरपाई द्यावी, त्यांचा दसरा गेला, आता दिवाळी तरी गोड करावी. शेतकर्‍यांना भरपाई देण्यासाठी कसलीही चालढकल न करता राज्य सरकारने पुढे यावे तथापि, केंद्र सरकारचा विषय असेल तर त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू असेही त्या यावेळी म्हणाल्या.

दुर्गाष्टमीपर्यंत तोडगा न निघाल्यास
ऊसतोड कामगार आक्रमक

ऊसतोड कामगारांच्या संपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, हा प्रश्न सप्टेंबर मध्येच मिटला असता परंतू यात फाटे फोडण्याचे काम झाले. हा संप मी सुरू केला आहे. कामगारांच्या दरवाढी बाबत मी वारंवार साखर कारखाना संघाकडे आग्रह धरला आहे. संबंधित नेत्यांनाही बोलले आहे. लवादा सोबत चर्चा करून हा प्रश्न मिटण्याची लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांपासूनची परंपरा आहे त्यामुळे दुर्गाष्टमी पर्यंत यावर तोडगा नाही निघाला तर ऊसतोड कामगार दुर्गेचा अवतार घेतल्याशिवाय राहणार नाहीत असे त्या म्हणाल्या. यावेळी आ. राजेश पवार, आ. तुषार राठोड, देविदास राठोड व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version