मुंबई, 17 ऑक्टोबर : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूरमध्ये पावसामुळे हाहाकार उडाला आहे. शेतकऱ्याच्या समोर ऐन हंगामात हातात आलेले पिकं डोळ्यसमोर पाण्यात वाहून गेले आहे. हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार हे अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करणार आहे.
कोरोनाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर अतिवृष्टीचे संकट कोसळले आहे. राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे बळीराजाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली सोन्यासारखी ऊस, कापूस, तांदूळ, सोयाबीनची पिकं पाण्यात वाहून गेली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अतिवृष्टी भागाचा आढावा घेतला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाड्याचा दौरा करण्याचे नियोजन केले आहे.
शरद पवार हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तुळजापूर, उमरगा,औसा, परांडा, उस्मानाबाद भागाची पाहणी करणार आहे. उद्या अर्थात 18 ते 19 ऑक्टोबर दौरा करणार आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेताची पाहणी करणार आहे. पहिल्या टप्प्यात हा त्यांचा दौरा असणार आहे.
राज्यावर जेव्हा जेव्हा संकट परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तेव्हा शरद पवार यांनी नेतृत्वाची कमान आपल्या हाती घेतली आहे. राज्यात कोरोनाची परिस्थितीत चिंताजनक आहे. पण, अशाही परिस्थितीत कोरोनाची तमा न बाळगता शरद पवार यांनी राज्यातील वेगवेगळ्या भागात जावून पाहणी केली.