मुंबई, दि. 7 ऑक्टोबर : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीदरम्यान समोर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर रियाचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु, एनसीबीकडे पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच सुटकेनंतर दहा दिवस जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, असे आदेश उच्च न्यायालयाने रियाला दिले आहेत. रियाला जामीन मिळाला असला तरी तिचा भाऊ शौविकचा जामीन अर्ज मात्र फेटाळून लावला आहे. तसेच या प्रकरणात शौविक चक्रवर्तीसह अब्दुल बासित परिहार, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांचाही जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. रिया चक्रवर्तीसह सर्व आरोपींच्या जामीन अर्जावर कोर्टाची प्रक्रीया सकाळी 11 वाजता सुरु झाली होती. त्यानंतर कोर्टाने लगेचच रियाचा जामीन अर्ज मंजूर केला. न्यायधीश सारंग वी. कोतवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत आपला निर्णय सुनावला. याआधी 29 सप्टेंबर रोजी या प्रकरणाच्या सुनावणीनंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. तसेच मंगळवारी एनडीपीएल कोर्टाने रिया, शौविक, सॅम्युअल, दीपेश, बासित परिहार आणि जैद यांच्या 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 20 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती.