Site icon लोकाशा-बंब न्यूज

अधिकच्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील 8397 हेक्टरवरील पिके उद्वस्त


औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा अतिवृष्टीमुळे विभागातील प्राथमिक पाहणीअंती जिरायत, बागायत व फळपिके असे तीन लाख 28 हजार 150 हेक्टर पिकांचे (33 टक्क्यांपेक्षा अधिक) नुकसान झाले. सर्वाधिक तीन लाख 20 हजार 926 हेक्टर पिकांची नासाडी औरंगाबाद विभागात झाली आहे, तर लातूर विभागामध्ये सात हजार 234.9 हेक्टर पिके पावसामुळे वाया गेले आहेत.

यंदा औरंगाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक 173.3 टक्के पाऊस झाला आहे. त्या पाठोपाठ जालना जिल्ह्यातही दीडशे टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. लातूरच्या तुलनेत औरंगाबाद विभागात पाऊसही अधिक झाल्यामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. विभगातील 1896 बाधित गावांमधील 4 लाख 98 हजार 573 शेतकर्‍यांचा खरीप पावसाने बुडवला, तर लातूर जिल्ह्यातील दोन गावांमधील 14 हजार 864 शेतकर्‍यांना नुकसान झाले. अद्याप विभागात पंचनामे सुरूच असून अद्याप पावसाचे दोन आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे येत्या कालावधीत अधिक पाऊस झाला तर नुकसानीच्या हेक्टरमध्ये भर पडू शकते. आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 173.4 टक्के, जालना 161.4, बीड 130.2, लातूर 110.0, उस्मानाबाद 104.8, नांदेड 104.1, परभणी 111.3 तर हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 124 टक्के पाऊस झाला आहे. अधिकचा पाऊस झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील जवळपास 8397 हेक्टरवरील पिके पुर्णपणे हातातून गेली आहेत. यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.
Exit mobile version