Site icon लोकाशा-बंब न्यूज

कृषी आयुक्तांचा दणका, सोयाबीनचे निकृष्ट बियाणे विक्री करणार्‍या 11 कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द


पुणे : सोयाबीनच्या निकृष्ट बियाणांचा पुरवठा केल्यावरून कृषी आयुक्त कार्यालयाने राज्यातील 11 बियाणे कंपन्यांचा विक्री परवाना कायमचा रद्द केला आहे. बीडसह राज्यात 1 लाख 60 हजार शेतकर्‍यांनी बियाणांबाबत तक्रार केल्या होत्या. 77 तक्रारींच्या सुनावणीनंतर ही कारवाई झाली असून आणखी 41 तक्रारींची सुनावणी लवकर होणार आहे, अशी माहिती कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिली.
खरीप हंगामासाठी कंपन्यांनी शेतकर्‍यांना या बियाणांचा पुरवठा केला होता. त्याची उगवणच झाली नाही. त्यामुळे काही शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या. त्याची दखल घेत कृषी आयुक्त कार्यालयाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाने बियाणांची तपासणी केली. त्यात बियाणांमध्ये कमतरता आढळली. त्यामुळे तक्रारदार शेतकर्‍यांच्या शेतातील बियाणांचा पंचनामा करून त्या कंपन्यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात येत आहे. निकृष्ट बियाणांमुळे राज्यातील सोयाबीनच्या 43 लाख हेक्टरपैकी 20 टक्के क्षेत्र बाधित होणार आहे. बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, अहमदनगर जिल्हे तसेच अन्य मोठ्या विभागांमधील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना या निकृष्टबियाणांचा फटका बसला आहे.

Exit mobile version