सातारा, दि. 27 सप्टेंबर: सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी सरकारविरोधात एल्गार पाहायला मिळत आहे. तर राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. आरक्षणावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यात आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठं विधान केलं आहे. ’मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळ्याच समाजाचं आरक्षण रद्द करा. गुणवत्तेनुसार, मेरिटवर सर्वांची निवड करा’, अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
पुण्यात 3 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण प्रश्नावर विचारमंथन बैठक होणार आहे. या बैठकीचे निमंत्रण घेऊन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सातार्यात गेले होते. विनायक मेटे यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. या भेटीनंतर खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षणाच्यामुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. उदयनराजे यांनी सांगितलं की, मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर समाजात प्रचंड रोष आहे. इतक समाजाला ज्या पद्धतीनं आरक्षण मिळालं, त्याच पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही अॅडमिशन मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा. मेरिटवर सर्वांची निवड करा,’ असे उदयनराजे म्हणाले. इतर समाजात कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. देवानं प्रत्येकाला बुद्धी दिली आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिज. अभ्यास करुन चांगले गुण असूनही अॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे. यापूर्वीही मी म्हणालो होतो सर्व आरक्षण रद्द करुन आर्थिक निकषावर आरक्षण द्या, मात्र तसे झाले नाही,’ अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी यावेळी दिली आहे.