Site icon लोकाशा-बंब न्यूज

वीज पुरवठा सुरळीत करा, रोहित्रासाठी शेतकर्‍यांची अडवणूक होता कामा नये,महावितरणच्या आढावा बैठकीत आ.संदिप क्षीरसागरांच्या अधिकार्‍यांना सूचना


बीड, दि. 24 : शहरात व ग्रामीण भागात वीज पुरवठा अचानकपणे खंडीत होतो तर काही ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्यानंतर तासनतास वीज पुरवठा सुरू केला जात नाही अशा तक्रारी आल्यानंतर तातडीने वीज पुरवठा सुरळीत करा, शहराला पाणी पुरवठा करणार्‍या विद्युत केेंद्र व विजेच्या लाईनमध्ये बिघाड झाल्यास त्याची तातडीने दुरूस्ती करा, शहरातील पाणी पुरवठा यावर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या, पाणी पुरवठा विभागाशी समन्वय ठेवा नागरिकांच्या तक्रारी येवू देवू नका, रोहित्रासाठी शेतकर्‍यांची अडवणूक होता कामा नये अशा सूचना महावितरणच्या आढावा बैठकीत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.
बीड विधानसभा क्षेत्रातील बीड व शिरूर तालुक्यातील महावितरणच्या संदर्भात शेतकर्‍यांच्या, नागरिकांच्या, व्यापार्‍यांच्या अनेक तक्रारी येत असल्याने आढावा बैठकीचे आयोजन आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या महावितरणच्या आढावा बैठकीला कार्यकारी अभियंता गाडे, भारंबे, आहेर व इतर अधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकीत महावितरण संदर्भातील नागरिकांच्या तक्रारी, सबस्टेशन निहाय प्रस्तावित व नव्याने करावयाची कामे, डिपी, नवीन वीज पुरवठा लाईन व नागरिकांची मागणी लक्षात घेता करावयाची कामे याबाबत अधिकार्‍यांनी माहिती दिली. यावेळी बोलतांना आ.संदिप क्षीरसागर म्हणाले की, महावितरणच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारीची तातडीने सोडवणूक व्हावी. वीजेचा लपंडाव थांबवावा, रोहित्रासाठी शेतकर्‍यांची अडवणूक होता कामा नये, प्रशासकीय पातळीवर महावितरणच्या अधिकार्‍यांना येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहू, निधी कमी पडू दिला जाणार नाही परंतू महावितरणमधील अधिकारी, कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. बीड व शिरूर तालुक्यातील महावितरणच्या कामाबाबत सबस्टेशन निहाय नागरिकांच्या, शेतकर्‍यांच्या मागणीनुसार आराखडा बनवून त्यावर काम करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. या महावितरणच्या आढावा बैठकीला अधिकारी, कर्मचार्‍यासह पदाधिकार्‍यांची उपस्थित होती.

वीजेअभावी शहराचा पाणी पुरवठा
खंडीत होता कामा नये

शहराला पाणी पुरवठा करणार्‍या माजलगाव व पालीच्या धरणात भरपुर पाणीसाठा आहे. माजलगावहून शहराला पाणी पुरवठा होत असतांना या ठिकाणानी विद्युत केंद्रात विजेचा बिघाड होणे, काडीवडगाव व ईट येथील जलशुद्धीकरण केंद्राला विद्युत पुरवठा करणार्‍या विद्युत लाईनमध्ये बिघाड झाल्यानंतर त्याची दुरूस्ती तातडीने होत नाही व त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर होतो. पालिका, पाणी पुरवठा विभाग व महावितरण यांच्यात समन्वय नाही. ही गंभीर बाब आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या निदर्शनास आल्यानंतर वीजेअभावी शहराचा पाणी पुरवठा खंडीत होता कामा नये अशा सक्त सूचना त्यांनी महावितरणच्या व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

Exit mobile version