औरंगाबाद, दि. 16 : राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आज (दि.16) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उदय सामंत यांनी सकारात्मक निर्णय घेत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्वरीत अंमलबजावणी करण्याचे सूतोवाच केल्याचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे मा.आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.
वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात बैठक आयोजित करावी अशी विनंती मा.आ.सतीश चव्हाण यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. त्यानुसार आज मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रामुख्याने सहायक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया, तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे रखडलेले वेतन, अकृषिक विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, वरिष्ठ महाविद्यालयांचा कायम शब्द काढणे, बिगर नेट-सेट धारक तदर्थ प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा झाल्याचे मा.आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. राज्यात वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी यासाठी वित्त विभागाची मंजूर घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, तासिका तत्वावर काम करणार्या प्राध्यापकांचे रखडलेले वेतन तात्काळ अदा करण्यात येईल. यामध्ये ज्यांनी ज्यांनी तासिका घेतल्या त्यातील एकही प्राध्यापक वेतनापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतल्या जाईल असे उदय सामंत यांनी बैठकीत सांगितले. तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या 71 दिवसांच्या संपाचा पगार निर्गमित करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. अकृषिक विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात देखील सकारात्मक चर्चा झाली. यासंदर्भात आढावा घेऊन जे सातव्या वेतन आयोगाला पात्र आहेत त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल. राज्यातील कायम विनाअनुदानित तत्वावरील वरिष्ठ महाविद्यालयांचा कायम शब्द काढण्यासंदर्भात लवकरच वित्त विभागाशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावला जाईल. बिगर नेट-सेट धारक तदर्थ प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात देखील सकारात्मक निर्णय झाला. यामध्ये सेवा नियुक्ती दिनांकापासून ग्रहीत धरून पदोन्नतीचे लाभ देण्याबाबत येणार्या बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक आयोजित केली जाईल असे उदय सामंत यांनी बैठकीत सांगितले. तसेच 200 बिंदूनामावली संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करून यावर देखील लवकरच तोडगा काढला जाईल असे देखील ते म्हणाले. या बैठकीत उदय सामंत यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मा.आ.सतीश चव्हाण यांनी त्यांचे आभार मानले. याप्रसंगी आ.दत्तात्रय सावंत, आ.बाळाराम पाटील, आ.श्रीकांत देशपांडे, आ.मनिषाताई कायंदे आदींची देखील उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने 4 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात नोकर भरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या भरती प्रक्रिया बंदीतून प्राचार्य पद वगळण्यात यावे अशी मागणी मा.आ.सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. राज्यातील बर्याच वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सेवा निवृत्त होत आहेत. महाविद्यालयात कायम स्वरूपी प्राचार्य नसल्यास प्रशासनावर वचक राहत नाही. तसेच अनेक महाविद्यालयांना नॅक साठी देखील अडचणी येत असल्याचे मा.आ.सतीश चव्हाण यांनी अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना अजित पवार यांनी वित्त विभागाच्या सचिवांना दिल्या असल्याचे मा.आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.