मुंबई, दि. १२ (लोकाशा न्यूज) : शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश रद्द करून सर्व प्रक्रिया नव्याने राबवण्याचे आदेश राज्य सरकारकडून विद्यापीठांना देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाने बुधवारी निर्णय देताना या आरक्षणाचा आधीच मिळालेला लाभ अबाधित राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. हे प्रकरण अधिक न्यायाधीशांच्या पीठाकडे वर्ग करण्यात येणार असल्याचंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.
मराठा आरक्षणास तूर्त स्थगिती देताना पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या झालेल्या प्रवेशांमध्ये बदल करू नये, असं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशांमध्ये बदल होणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. अद्याप प्रवेश प्रक्रिया न झालेल्या वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेत यंदा आरक्षण लागू होणार नाही. पण राज्यातील बहुतेक विद्यापीठांच्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या पदवीची प्रवेश प्रक्रिया झाली आहे, तर अकरावी, पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. त्यात आरक्षण लागू होणार की नाही, याबाबत संदिग्धता होती. गुरुवारी जाहीर होणारी अकरावीची दुसरी प्रवेश यादी स्थगित करण्यात आली होती. शासन निर्णयानंतर पुढील यादीबाबत कळविण्यात येईल, असं शिक्षण विभागाने जाहीर केलं होतं. प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश रद्द करण्याच्या सूचनांनंतर अकरावी प्रवेशाचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.